प्रशासकीयब्रेकिंग न्युज

खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा

आठवडा विशेष टीम―

भंडारा, दि.१७ :- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड 19 बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी कंट्रोल रुम तयार करुन त्या माध्यमातून बेड उपलब्ध करुन देण्यात यावे. खाजगी रुग्णालयातील कोविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी दराचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी सांगितले. अन्यथा त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रायव्हेट हॉस्पिटलला परवानगी देतांना त्यांचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात Rtpcr टेस्ट वाढविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या त्यासाठी लॅबची क्षमता सुध्दा वाढवावी असे निर्देश त्यांनी दिले. कोविडचा रिपोर्ट मिळण्यासाठी उशिर होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आता रुग्णांना SMS व्दारे रिपोर्ट मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

भंडारा सामान्य रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सुध्दा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

डॉक्टर व नर्सेसची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. बरेचदा डॉक्टर व नर्सेस रुजू झाल्यानंतर दोन तिन दिवसाताच नोकरी सोडून जातात त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. असे प्रकार होवू नयेत म्हणून रुजू होते वेळी त्यांचे कडून करार लिहून घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्याला 2 लाख 350 डोस प्राप्त झाले असून 1 लक्ष 68 हजार 504 लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. लसीकरणात भंडारा जिल्हा पहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

रेमडेसिव्हीरचा काळा बाजार रोखा

मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडेसिव्हीर वाजवीपेक्षा अधिक दराने विकली जात असून रुग्णांना आवश्यकता नसतांना अनेक वेळा रेमडेसिव्हीरच प्रिस्क्राईब केली जाते. रेमडेसिव्हीरचा काळा बाजार तात्काळ रोखण्यात यावा. तसेच खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.