प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 17: महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.

या बैठकीविषयी प्रसारमाध्यमांना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी माहिती दिली. त्यातील मुद्दे असे :

  • महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
  • रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात 132 प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
  • रेमडेसिवीर तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
  • रेमडेसिवीरवरील निर्यात बंदीमुळे 15 कंपन्यांच्या आहे जो साठा शिल्लक आहे त्यातील जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
  • कोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील 1100 पैकी 500 नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. सर्वात जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र याविषयी सविस्तर माहिती संशोधनाअंती दिली जाणार आहे.
  • राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने जास्तीत जास्त पुरवठा करावा. दररोज आठ लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो, मात्र त्या प्रमाणात पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल तसे त्याचा पुरवठा केला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button