पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

सांगली दि. १७ (जि.मा.का.) :  सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे अचानकपणे ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या जवळपास 30 टनापर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनचा रोजचा वापर होत आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनची तितकी उपलब्धता होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रभर आणि देशभर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिथून ऑक्सिजन उपलब्ध होईल तिथून तो मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारे संबंधित अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा व रेमडेसिविर औषधाचा पुरवठा होणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु एकंदरच ज्या वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यात दिवसेंदिवस जिकरीचे झाले आहे. यामुळे कोरोणाची साखळी तोडणे हाच प्रभावी पर्याय आपल्याकडे आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच रहावे व घरात राहूनच सर्व कामे करण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर पडू नये. असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

ऑक्सिजन उपलब्धतेसाठी यंत्रणा सर्वतोपरी जागरुकतेने प्रयत्न करत आहे, पण मर्यादेपेक्षा जास्त रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची उपलब्धी कमी झाली तर गंभीर संकट निर्माण होईल अशी स्पष्टताही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी रेमडेसिविरचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व या विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ही या बैठकीतूनच संपर्क साधला. राज्यभर आणि देशभर रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजन उपलब्धतेवर मर्यादा येत आहेत हे लक्षात घेऊन जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभी करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले.

सांगली जिल्हयातील कोवीड रूग्ण संख्या ,ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेड उपलब्धता, लसीकरण, संचारबंदी निर्बंधाची अंमलबजावणी आदी बाबीचा सविस्तर आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत बैठकीत घेतला. या बैठकीसाठी कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम हे मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरंसिगव्दारे सहभागी झाले होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक दिक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जितेंद्र डुडी, महानगर पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले- बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री. भांडरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 लाख 87 हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून प्रतिदिन 30 ते 35 हजार नागरिकांना लसीकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी लस उपलब्धतेत अडथळा निर्माण होत आहे, हे लक्षात घेऊन व लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नाव नोंदणी करावी लस उपलब्धतेप्रमाणे तेथील यंत्रणा आपल्याशी संपर्क करून लसीकरणासाठी बोलवेल. त्यातून गर्दी टाळली जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. लस पुरेशा प्रमाणात उपलब्धतेसाठी प्राधान्याने राज्य शासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोणाचे  उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी रुग्णांना गरज लक्षात घेऊन रेमडेसिविरचा वापर करावा. अनावश्यक व सरसकटपणे या औषधाचा वापर टाळावा.असे सांगून रेमडेसिवीरचा सुनियोजित वापर होतो किंवा नाही याचे काटेकोरपणे ऑडिट यंत्रणेमार्फत करण्यात यावे असे निर्देश यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या, उपलब्ध बेड या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आवश्यकता लक्षात घेऊन कोरोना उपचारासाठी त्वरित रुग्णालय आरक्षित करावीत व यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देशीत केले.

या बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी लसीकरण उपलब्धतेबाबत तालुकास्तरावर पूर्वसूचना देण्यात यावी असे सूचित केले. तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर नोंदणी करावी उपलब्धतेप्रमाणे त्यांना संपर्क साधून लसीकरणासाठी बोलावले जाईल. यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळली जाईल असे सांगितले. पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावी तसेच तात्काळ ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी डॉ. विश्वजीत कदम हे सध्या मुंबईत असल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून पाठपुरावा करावा असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी डॉ. विश्वजीत कदम यांना यावेळी केले.

मिरज तालुक्याचाही घेतला स्वंत्रत आढावा

या बैठकीनतंर पालकमंत्री जयंत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे यांच्याकडून कोरोना स्थिती, एकूण लसीकरण याबाबत आढावा घेतला. मिरज तालुक्यात आतापर्यंत 5466 कोरोनाबाधितांची संख्या असून 40367 नागरिकांना लसीकरण झाले आहे. असे सांगण्यात आले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.