ब्रेकिंग न्युज

सिंधुदुर्गच्या विकासासाठी 170 कोटी; रत्नागिरीसाठी 250 कोटी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11 : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) सन 2021-22 ची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 170 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण तंत्र मंत्री तथा सिंधुदुर्ग पालक मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टीकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 170 कोटीच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधु-रत्न समृद्धी विकास योजना जाहीर केली होती. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विमानतळाकडे जाणारे रस्ते, सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरणासाठी निधी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती भवन यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

 

रत्नागिरी जिल्ह्यासाठी 250 कोटी मंजूर

 

रत्नागिरी जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने जिल्हा स्तरावरुन पर्यटन विकासाचे अनेक उपक्रम व योजना राबविण्यासाठी सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेत 250 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला परिवहन मंत्री तथा रत्नागिरी पालकमंत्री अनिल परब उपस्थित होते.

 

रत्नागिरी जिल्ह्यासाठी सन 2020-21 मध्ये 211 कोटी रुपये अर्थसंकल्पीत करण्यात आले होते. सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कृषी व मत्स्य व्यवसाय शैक्षणिक सोयी सुविधा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री श्री.अनिल परब यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. ह्या मागणीची दखल घेवून वित्त व नियोजन मंत्री श्री. अजित पवार यांनी 250 कोटी रुपयांच्या नियतव्ययास मान्यता दिली आहे.

000

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    काशिबाई थोरात/विसंअ/11.02.2021

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.