आठवडा विशेष टीम―
वाशिम, दि. १८ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा उभारणे आवश्यक आहे. याकरिता नवीन कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची (ऑक्सिजन बेड) संख्या वाढवावी. एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, १८ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, खाटांची संख्या, प्राणवायू व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा या अनुषंगाने आढावा घेतला.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच बाधितांवरील उपचारासाठी आणखी सुविधा उभारण्याची गरज आहे. एकही रुग्ण उपचाराअभावी परत जाऊ नये, यासाठी पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे या सुविधा निर्मितीसाठी युद्धपातळीवर काम करावे. वाशिम येथील स्त्री रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात प्राणवायूची सुविधा असलेल्या आणखी १०० खाटा उपलब्ध करण्याची कार्यवाही करावी. आणखी काही ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे . स्त्री रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेला ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ तातडीने कार्यान्वित करावा. तसेच सामान्य रुग्णालय परिसरातील ‘लिक्विड ऑक्सिजन टँक’ उभारणीच्या कामाला गती द्यावी. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
जिल्ह्याला प्राणवायूचा सुरळीत पुरवठा व्हावा, त्यामध्ये कोणताही अडथळा येवू नये, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसुद्धा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संपर्कात असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनाही केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. त्यामुळे पोलिसांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. परवानगी दिलेली दुकाने, आस्थापना याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, त्यामुळे नागरिकांनीसुद्धा नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.