भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. १८ : माणसांना प्रेमाने जोडणारे आणि भक्ती, बंधुभाव, एकता व समानतेचा विचार देणारे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आदी महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर महत्त्वाचा प्रभाव असल्याचे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांनी आज मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील  संत आणि शीख व काश्मिरी तत्वज्ञान या विषयावर  ३० वे  पुष्प गुंफताना श्री. नहार बोलत होते.

संत नामदेवांनी भक्ती व प्रेमाचा झेंडा खांद्यावर घेऊन जात पंजाबमध्ये या कार्याचा विस्तार केला. शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या ६१ पद्यांचा समावेश आणि येथील जनमानसावर त्याचा प्रभाव अनन्यसाधारण आहे. तसेच, काश्मीरमधील शैव संप्रदायाच्या संतांवर असलेला संत ज्ञानेश्वरांचा प्रभावही  तितकाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील या संत द्वयांसह अन्य संतांनी दिलेल्या बंधुभाव, एकता व समानतेच्या विचारांचा प्रभाव शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर आहे आणि यामुळे या राज्यांचा महाराष्ट्राशी असलेला बंध अधिक दृढ आहे, असे श्री. नहार यावेळी म्हणाले. आसामसह इशान्येकडील अन्य राज्यांमध्येही महाराष्ट्रातील संतांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो असेही त्यांनी सांगितले.

सुमारे ३५ वर्षांपासून पंजाब आणि काश्मीरमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून जोडल्याने या अनुभवाच्या आधारावर श्री.नहार यांनी महाराष्ट्रातील संतांच्या विचारांचा या राज्यातील तत्वज्ञानावर असलेला प्रभाव व बंधांवर प्रकाश टाकला. १९८४ नंतर पंजाबमध्ये निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तरुणांनी एकत्र येत वंदेमातरम संघटनेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु केलेल्या कार्यात संत नामदेवांच्या विचारांचा शीख तत्वज्ञानावरील प्रभाव जाणवल्याचे त्यांनी सांगितले. गुरु गोविंदसिंह यांनी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये वास्तव्य करून गुरुग्रंथसाहिब’ ग्रंथाला अंतिम स्वरूप दिले व ‘गुरु मानियो ग्रंथ’ अर्थात ग्रंथांनाच यापुढे गुरुस्थानी ठेवा हे विचार मांडले. संत नामदेवांनी पंजाबभर भक्तीचा संदेश दिला. या संतांच्या संदेशांनी उभय राज्यांना जोडले असे सांगून श्री. नहार म्हणाले, पंजाब,राजस्थान आणि पाकिस्तानातील अनेक गावांमध्ये संत नामदेवांची मंदिरं अस्तित्वात आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ‘घुमान’ येथील गुरुद्वाऱ्यात संत नामदेवांची मूर्ती तसेच मशिदीच्या आकाराचे घुमट असून  हिंदू व मुस्लिमांनी एकत्र येण्याचा संदेश देणारा हा जगातील एकमेव गुरुद्वारा असल्याचे त्यांनी सांगितले. घुमान शेजारीच कादियान येथे ‘अहमदिया’ या मुस्लिम धर्मातील बंडखारे पंथाचे मुख्य केंद्र आहे या पंथावरही संत नामदेवांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे श्री. नहार म्हणाले.

संत नामदेवांचे वास्तव्य राहिलेल्या ‘घुमान’ या गावात ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून २०१५ मध्ये आयोजित करण्यात आलेले ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्यास पंजाब सरकारने केलेले सहकार्य व त्यातून  पंजाबमध्ये  उभे राहिलेले ‘संत नामदेव विद्यापीठ’ व ‘भाषा भवन’ आदींचीही माहिती श्री. नहार यांनी यावेळी दिली.

९० च्या दशकात काश्मीरमध्ये कार्य करताना महाराष्ट्रातील संतांच्या विचारांचा काश्मिरी तत्वज्ञानावर असलेल्या प्रभावाची जाणीव झाली असे श्री. नहार म्हणाले. काश्मिरी शैव संप्रदायाच्या संत लल्लेश्वरी यांच्या साहित्यात संत ज्ञानेश्वरांनी मांडलेली रुपके व प्रतिमांचा उल्लेख येतो. काश्मिरी शैव संप्रदायाचे जनक अभिनवगुप्त  यांचे पूर्वज महाराष्ट्रातील असल्याचे संशोधनही पुढे आले असल्याने येथील तत्वज्ञानावर महाराष्ट्राचा प्रभाव दिसून येतो असे श्री. नहार म्हणाले.

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत शेख महंमद आदी महाराष्ट्रातील संतांनी माणसांतील दृष्टप्रवृत्तीचा नाश होऊन त्यांना सत्कर्मात गती वाढविण्याचे दिलेले विचार पंजाब, काश्मीर व इशान्येकडील राज्यांमध्ये उपयोगाचे आहेत. सर्वांनी हे विचार आचरणात आणण्याची व पुढे नेण्याची गरज असल्याचेही श्री. नहार यांनी सांगितले.

०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.११२/दिनांक १८.०४.२०२१

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.