बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल सुप्रसिद्ध भालचंद्र गणपती मंदिराच्या खाजगी विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंभा- पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत तात्काळ खाजगी विश्वस्त मंडळ बरखास्त करून सार्वजनिक विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशी मागणी करत विलास जाधव पोलीस उपनिरीक्षक नेकनुर पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले.
लिंबागणेश येथिल भालचंद्र गणपती मंदिर खाजगी विश्वस्त मंडळ असून गणेश भक्तांना अपमानास्पद वागणूक देणे, गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तुची विक्री करणे, ग्रामस्थांच्या परस्पर ईनामी जमिनीची विक्री करणे आदि गैरप्रकार खाजगी विश्वस्त मंडळीनी केल्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट असून तात्काळ खाजगी विश्वस्त ट्रस्ट बरखास्त करण्यात यावे आणि सार्वजनिक मंडळ स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे.
अन्नदान सुद्धा बंद केले:- गणेशकाका मोरे
दर चतुर्थीला भाविकांनी दिलेल्या देणगीतून शाबुदाना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते, खाजगी विश्वस्त मंडळ केवळ चतुर्थी दिवशी देणगी गोळा करण्यासाठी येतात त्यांना देवस्थानाशी काहीही देणेघेणे नाही.
देवस्थानासाठी पिण्याचे पाणी, शौचालय आदि कोणत्याही मुलभूत सुविधा विश्वस्त मंडळ उपलब्ध करून देत नाही. सर्व सुविधा भाविकांनी दिलेल्या देणगीतून होत आहेत.
5 वर्षात 15 आंदोलनानंतर तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दीड कोटी निधी मिळवला:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
लिंबागणेशकरांनी 5 वर्षात धरणे, रास्ता रोको, दींडी आंदोलन,टाळमृदंग, घंटानाद आदि आंदोलनानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री मा. पंकजाताई मुंढे यांनी तीर्थक्षेत्र दर्जा देऊन दीडकोटी रूपये विकास निधी दिला. शासकीय निधी मिळाल्यानंतर खाजगी विश्वस्त मंडळ आपोआप बरखास्त होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 वेळा धर्मादाय आयुक्तांना आदेश देऊन सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळेच आज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात कल्याणबापु वाणी, शिवा आबा वाणी, ज्येष्ठ शिवसेनानेते गणेशकाका मोरे, रविंद्रजी निर्मळ,पांडुरंग वाणी, अशोकराजे वाणी, रमेश घोलप,बाजीराव दशमे, विनायक मोरे, दादाराव येडे सुनिल ढवळे, दत्ता घरत, विक्की आप्पा वाणी आदि ग्रामस्थ हजर होते.