‘एनसीसी’ हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १९ : नवीन शिक्षण धोरणात निवड आधारित श्रेयांक पद्धतीचा पुरस्कार करण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांना विषय निवडीचा अधिकार असणार आहे. त्यामुळे एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नसल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

श्री.केदार म्हणाले, वैकल्पिक विषय झाल्याने विद्यार्थी  एनसीसीकडे वळतील, असा आम्हाला विश्वास आहे. शिस्त, देशप्रेम शिकविणाऱ्या या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. याचबरोबर त्यांना नोकरीसाठीच्या विविध सरकारी योजनांचा लाभही घेता येऊ शकेल.

एनसीसीच्या परेडचा सराव

कॅम्पला जायचे तसेच अभ्यासाला वेळ कसा काढायचा, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो आणि इच्छा असूनही ते एनसीसीच्या वाटेला जात नाहीत. मात्र आता एनसीसीला वैकल्पिक विषयाचा दर्जा मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर या विषयाला सहा सत्रांमध्ये २४ क्रेडिट देण्यात येणार आहेत. याचबरोबर या विद्यार्थ्यांना एनसीसीचे ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्रही मिळविता येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना कार्यवाही करण्याची सूचना केली असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

शाळेत एनसीसीमध्ये भाग घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येही त्यात सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र अभ्यास आणि एनसीसीसाठी द्यावा लागणारा वेळ याचा ताळमेळ जुळत नसल्याने बहुतांश विद्यार्थी यापासून दूर राहतात. परिणामी शाळांपेक्षा कॉलेजमध्ये एनसीसीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते. एकता, शिस्त, देशभक्ती, आरोग्य आदी विषयांचे शिक्षण देणाऱ्या या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी २०१३ मध्ये सर्व प्रथम याला वैकल्पिक विषय म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता परंतु आता ‘नवीन शिक्षण धोरणा’चा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबतचे परिपत्रक काढले असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

श्री.केदार म्हणाले, आता राज्यातील एनसीसी संचालकांवर याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

एनसीसीचा अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. यात थेअरीसाठी सहा सत्रांमध्ये आठ क्रेडिट, प्रात्यक्षिकांसाठी सहा क्रेडिट तर दोन कॅम्पसाठी १० क्रेडिट देण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, व्यायाम याचबरोबर नकाशा वाचन, शस्त्र प्रशिक्षण, समाजसेवा आदीचे शिक्षण दिले जाणार आहे.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.