जगाच्या पाठीवर मराठी माणसांची चमकदार कामगिरी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. १९ : प्रतिभा व प्रतिमेच्या जोरावर जगात मराठी माणसाने व्यापार-उद्योगात नाव कमाविले आहे. तसेच, काही देशांमध्ये राजकारणातही उत्तम कामगिरी केली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज व्यक्त केले.

जगाच्या पाठीवरील मराठी या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प गुंफताना श्री. राऊत बोलत होते.

महाराष्ट्र व मराठीचा जागतिक राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्द कौशल्यास जागतिक इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाने जागतिकस्तरावर अन्यायाविरोधात आवाज उठवत समर्थपणे भूमिका मांडल्या आहेत. जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणाऱ्या मराठी माणसाने आज जगात सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले असून व्यापार, उद्योग आणि राजकारणातही त्यांनी प्रवेश केला आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे श्री. राऊत म्हणाले.

कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर आज जगभरात मराठी माणसांचा वावर आहे. स्पर्धेत पूरेपूर उतरून मराठी माणसाने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, उत्तुंग झेप घेतली आहे व आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अमेरिकेपासून, इस्त्रायल, आयर्लंड, जपान, मॉरीशस, अफगाणीस्तान आदी देशांमध्ये मराठी माणसांनी  कर्तबगारी दाखविल्याचे आश्वासक चित्र आहे.

आयर्लंडचे पंतप्रधानपद भूषविणारे लिओ वराडकर हे कोकणातील मालवणचे आहेत. त्यांच्या रूपाने मराठी माणसाने एका देशाच्या प्रमुखपदाचे सर्वोच्च स्थान मिळविले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या असेंब्लीमध्ये श्री. ठाणेदार हे मराठी गृहस्थ मोठ्या मतांनी निवडून आले आहेत, अनेक वर्ष तेथील राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लडमधील राजकारणात मराठी माणूस आहे. मॉरीशस मधील राजकारणात, संसदेत व मंत्रिमंडळात मराठी माणस आहेत. जगाच्यापाठीवरील या मराठी माणसांकडे आपण मोठ्या अपेक्षेने पाहिले पाहिजे, असे श्री राऊत म्हणाले.

मराठी माणूस हे कलाप्रेमी आहेत. परदेशातही मराठी नाटक, चित्रपट, संगीत  मैफिली आदींच्या आयोजनांतून त्यांनी मराठीची जोपसना केली आहे. बृह्नमहाराष्ट्र मंडळ, मराठी परिषदा आदींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची जोपासना केली आहे. मॉरीशस आणि अमेरिकेत मराठी मंडळांच्यावतीने गणेशोत्सव साजरे होतात. शिकागो, न्युयॉर्क आणि  कॅनडामध्ये भरणारे बृह्ममहाराष्ट्र परिषदांचे अधिवेशन यावरही श्री. राऊत यांनी प्रकाश टाकला. इस्त्रायलमध्ये ‘मायबोली’ हे मराठी नियकालीक चालवले जाते, त्यास मोठा मराठी वाचक लाभला आहे. तेथे मराठी कार्यक्रम, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मराठी भाषेचे उत्सव साजरे होतात. माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कुसुमाग्रजांच्या उपस्थितीत इस्त्रायलमध्ये जागतिक मराठी परिषदेचे पहिले संमेलन भरविण्यात आले होते. जगभरातील मराठी माणसांनी व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी माणसांनी जागतिकस्तरावर सक्षमपणे भूमिका मांडल्या

भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत लंडन हे मराठी माणसाचे लक्ष्य होते. लोकमान्य टिळक हे लंडनला जावून आपली बाजू मांडून आले होते. राघोबादादांना पेशवाईचे वस्त्र मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी आपला वकील लंडनला संपर्कासाठी पाठविला होता. ब्रिटीशांनी अन्यायपणे साताऱ्याची गादी खालसा केल्याच्या विरोधात छत्रपती प्रतापसिंह राजे यांचे वकील रंगो बापुजी हे लंडनला संपर्कासाठी गेले होते. त्यावेळी रंगो बापुंनी लंडनच्या हैलपार्कमध्ये ‘राजा मेला, तरी न्याय मेला नाही’ अशी  गर्जना  करून वैचारिक लढा दिला. डॉ. एम. के. पारधी हे मराठी गृहस्थ 1910 मध्ये लंडन येथे स्थायिक झाले. साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी 1932 च्या सुमारास गोलमेज परिषदेत गर्जना केली होती. स्वातंत्र्याच्या क्रांतिची ठिणगी देशात टाकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याची सुरुवात लंडनपासून केली, येथील वास्तव्यात त्यांनी मराठी क्रांतिकारकांना एकत्र करण्याचे काम केले, असे श्री. राऊत म्हणाले.

परदेशात नोकरदारीत अग्रणी असलेल्या मराठी माणसांनी आता प्रशासनातही आपला दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. जगात मराठीची अस्मिता जपावी व प्रशासनात सहभागी होऊन मराठी माणसांनी संकटसमयी महाराष्ट्राला सहकार्य करावे तसेच राज्याच्या विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षाही श्री. राऊत यांनी व्यक्त केली.

०००

 

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.114/दिनांक 19.04.2021

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.