Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 19 : देशातील कोरोना महामारी संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसदीय कार्य मंत्री, विरोधी पक्षनेते यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे आज बैठक घेतली.
या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विविध राज्यांचे विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि संसदीय कार्य मंत्री उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोना रोखण्यासाठी राज्यात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी राहिला आहे. संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब म्हणाले की, राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे मृत्युदर कमी आहे. असंघटित कामगारांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. कोरोना रूग्णांसाठी केलेल्या उपाययोजना, रुग्णांना उपलब्ध बेड्स, ऑक्सीजनचा पुरवठा, लसीकरण यांची माहिती देऊन, कोरोना महामारीस नियंत्रणात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाई, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी काही प्रमाणात ताळेबंदीसह कडक निर्बंध लादण्यात आले असल्याची माहिती या बैठकीत श्री.परब यांनी दिली.
०००