केशवराव जेधे यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त उद्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उल्हासदादा पवार यांचे व्याख्यान  

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. २० : थोर सामाजिक कार्यकर्ते केशवराव जेधे यांची उद्या २१ एप्रिल रोजी १२५वी जयंती आहे, याचे औचित्य साधत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उल्हासदादा पवार हे ‘केशवराव जेधे आणि सामाजिक समतेची चळवळ’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३२ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे.या व्याख्यानमालेत २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उल्हासदादा पवार विचार मांडणार आहेत. या व्याख्यानात श्री. केशवराव जेधे यांच्या योगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

उल्हासदादा पवार यांच्याविषयी

संत परंपरेचे उपासक, साहित्य कलेचे रसिक, सामाजिक कार्यकर्ते, उत्तम वक्ते आणि राजकीय नेते म्हणून श्री उल्हासदादा पवार सर्वपरिचीत आहेत. वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक प्रभाव,महात्मा गांधीजींचे उदात्त मानवतेचे विचार तसेच आजोळी असलेला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा यातून श्री. पवार यांचे व्यक्तिमत्व घडले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी विद्यार्थी चळवळींमध्ये सहभाग घेतला. ‘नेतृत्व प्रशिक्षण’ आणि ‘ग्रामीण विकास’ याबाबत महाराष्ट्रभर आयोजित  चिंतन शिबिरांत त्यांनी विचार मांडले.

श्री. पवार हे सध्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदचे (पुणे)  कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. १९७८ ते १९८४ , २००० ते २००६ आणि २००६ ते २०१२ असे  तीन वेळा ते विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. आळंदी (१९९६) आणि पुणे(२०१०) येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  कार्याध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. पंढरपूर येथील ‘विठ्ठल रुक्मिणी’ मंदिराच्या पहिल्या शासकीय समितीचे ते सदस्य होते या समितीचे सदस्य म्हणून त्यांनी १४ वर्ष कार्य पाहिले आहे. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी ६ वर्ष जबाबदारी सांभाळली. त्यांनी तमाशा महोत्सवात १० वर्षे पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. देहू-आळंदी विकास परिषदेचे विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) चे उपाध्यक्ष आणि विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.  गेल्या ५ वर्षांपासून ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितेचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहेत.

महाराष्ट्राच्या कला, क्रीडा,सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. श्री. पवार हे एक उत्तम वक्ते आहेत.भाषेवरील प्रभुत्व,ओघवते वक्तृत्व आणि भाषणांमध्ये विविध संदर्भ देण्याची हातोटी  तसेच कविता,ओव्या, श्लोक, संताचे अभंग पेरण्याची त्यांची कला हे खास वैशिष्टे आहेत.

समाज माध्यमांद्वारे उद्या व्याख्यानाचे प्रसारण

बुधवारी, 21 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

००००

‍रितेश भुयार /वृत्त वि. क्र.११५/दिनांक २०.०४.२०२१