केशवराव जेधे यांनी सामाजिक समतेची चळवळ महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचवली

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. २१ : केशवराव जेधे यांनी सोप्या भाषेत व प्रभावीपणे मांडणी करत महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यांतील शेतकरी,अशिक्षित माणसांपर्यंत सामाजिक समतेची चळवळ पोहोचवून समाजप्रबोधन केले, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी आज दिली.

थोर सत्यशोधकी नेते केशवराव जेधे यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने केशवराव जेधे आणि सामाजिक समतेची चळवळ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३२ वे  पुष्प गुंफताना श्री. पवार बोलत होते.

बापुराव जेधे, आप्पासाहेब जेधे यांच्या सामाजिक चळवळीचा वारसा पुढे घेऊन जात केशवराव उपाख्य तात्यासाहेब जेधे यांनी महाराष्ट्रात सामाजिक समतेच्या लढ्यात दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. ब्राह्मणेतर पक्ष, हरिजन सेवक संघ, हरिजन मंदिर प्रवेश, शेतकरी संघ, शेतकरी कामगार पक्ष आदींच्या माध्यमातून तात्यासाहेबांनी भरीव कार्य केले. तात्यासाहेब जेधे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या सामाजकारणात निर्माण झालेल्या जेधे-गाडगीळ, जेधे-मोरे,जेधे-खाडीलकर,जेधे-जवळकर अशा जोड्या व त्यातून उभे राहिलेले सामाजिक समतेच्या लढ्याचे कार्य राज्याच्या इतिहासात मोलाचे आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांचा दौरा करून तात्यासाहेबांनी शेतकरी ,अशिक्षितांनाही सामाजिक समतेच्या चळवळीत सहभागी केले त्यांचे सोप्या शब्दात व प्रभावी मांडणीतून प्रबोधन केले असे श्री. पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या लढ्याचा इतिहास व जेधे यांचा या लढ्यात प्रवेश

महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या लढ्याला मोठा इतिहास आहे.भागवत संप्रदायाचे संतशिरोमणी ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांपर्यंतच्या संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समतेच्या संघर्षासाठी लढा दिला असे श्री पवार म्हणाले.

छत्रपती  शिवरायांच्या काळात उत्तम राज्य स्थापित झाले होते. दऱ्याखोऱ्यातील,सामान्य माणसापासून भटक्या विमुक्तांपर्यंत सर्व लोक सन्मानाने जगत होते. तरीही त्या काळात एक सुप्त अशा चातुर्वर्णाची उतरंड होती. पण छत्रपती  शिवरायांच्या नेतृत्वामुळे समाजात शांतता होती. पुढे पेशवाईच्या काळात पंडित वर्गाने वर्चस्व गाजवत  दैनंदिन जीवनामध्ये जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याच्या पुढच्या टप्प्यातील संघर्षाचे रुपांतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षामध्ये झाले. महात्मा फुले यांनी समतेचा लढा उभारला. त्यांनी सत्यशोधक चळवळ उभारून दलित, शोषित, वंचित, रंजलेले, गांजलेले, शिक्षणाचा व माणुसकीचाही हक्क नसलेल्या समाज घटकासाठी  संघर्ष  केला. या सत्यशोधकी चळवळीने पुढे ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळीचे रुप धारण केले व या संघर्षात तात्यासाहेब जेधे अग्रस्थानी होते असे श्री. पवार म्हणाले.

सामाजिक समतेची चळवळ,सामाजिक संघर्ष,समानता, जाती निर्मूलन आणि विषमता मोडून काढण्याच्या लढ्यातील महाराष्ट्रातील अग्रगण्य नाव म्हणजे तात्यासाहेब जेधे होय. स्वातंत्र्य चळवळीतील कार्य सुरु ठेवून तात्यासाहेब जेधे यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. या कार्यात प्रसंगी तात्यासाहेब जेधे आणि जवळकर यांनी लोकमान्य टिळकांनाही वैचारिक  विरोध केला असे श्री. पवार यांनी सांगितले. १९२६ -२७ मध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यातील जेधे मेंशन येथील वास्तव्यात त्यांनी  तात्यासाहेबांना ‘ब्राह्मणेतर पक्ष’ हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याची  विनंती केली. ही विनंती स्वीकारून तात्यासाहेबांनी  स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. पुढच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून अनेक संस्थानिकांसह कर्मवीर भाऊराव पाटील, इंदौरचे तुकोजी होळकर या सर्व मंडळींचा राबता जेधे मेंशन मध्ये असायचा. राजर्षी छत्रपती शाहू  आणि तात्यासाहेब जेधे यांचे संबंध अत्यंत चांगले होते. छत्रपती शाहू  पुण्यात जेधे मेंशनला येत व तिथेच मुक्काम करीत इतकी त्यांची जेधे घराण्याशी जवळीक होती असेही त्यांनी सांगितले.

तात्यासाहेबांनी पत्रकारितेतही योगदान दिले. ‘दै.कैवारी’ मध्ये संपादनाचे कार्य केले. ‘दै. मन्वंतर’ मध्ये काकासाहेब गाडगीळांनी तात्यासाहेबांवर लेख लिहिला. लोकमान्य टिळक  आणि  न. चिं. केळकर यांनी जेधे व जवळकरांविरूद्ध लिखाण केले तेव्हा त्यांनीही  टिळक व केळकरांविरूध्द लिहिले. शेवटी हा संघर्ष विसर्जित करून ते काँग्रेसमध्ये सामील झाले. लोकमान्य टिळकांशी  वैचारिक संघर्ष झाला मात्र त्यांनी वैयक्तिक विरोध केला नाही. पुण्याच्या  केसरीवाड्यात गोवा मुक्ती लढ्याचे अध्यक्ष म्हणून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समितीचे अध्यक्ष म्हणून जेधे यांनी गाजविलेल्या सभा याची साक्ष देतात असे त्यांनी सांगितले. पुढे महाराष्ट्राच्या समाजकारणात जेधे-गाडगीळ, जेधे-मोरे, जेधे-खाडीलकर आणि जेधे- जवळकर अशा जोड्या नावारूपाला आल्या व त्यांनी समाजकारणाला मोठी दिशा दिली यातील या सर्व जोड्यांतील सामाईक नाव असेलेले जेधे म्हणजे  तात्यासाहेब जेधे होत, असे श्री. पवार यांनी सांगिले.

महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या हरिजन सेवक संघामध्येही तात्यासाहेब जेधे यांनी कार्य केले. काही काळ त्यांनी हरिजन सेवक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. हरिजन संघाच्या माध्यमातून त्यांनी १९२६-२७ मध्ये पुणे येथील पर्वती मंदिर आणि त्यानंतर नाशिक येथील काळाराम मंदिर येथे हरिजन मंदिर प्रवेश लढ्यात अग्रणी सहभाग घेतला. यात त्यांच्यासोबत काकासाहेब गाडगीळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी बापुसाहेब राजभोर हे अग्रेसर हेाते असे श्री. पवार म्हणाले.

१९२७ मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे उभारलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात तात्यासाहेब जेधे यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

तात्यासाहेबांचा संघर्ष खेडया-पाडयातील शेतकरी अशिक्षित माणसांपर्यंत पोहोचला. सामाजिक समतेच्या लढ्याची ही चळवळ साध्या भाषेत जनसामान्यांना त्यांनी समजावून सांगितली. तात्यासाहेब जेथे आणि काकासाहेब गाडगीळ ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिली व त्यांनी  स्वातंत्र्य लढा व सामाजिक समतेचा लढा मजबूत केला. अशिक्षित व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी समाजिक समतेची चळवळ मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत शेतकरी संघ निर्माण केला पुढे मतभेद निर्माण झाल्यावर त्यांनी ‘शेतकरी कामगार पक्षा’ची स्थापना केली. थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीनुसार हा पक्ष पुन्हा त्यांनी  काँग्रेसमध्ये विलीन करून घेतला व समतेच्या लढ्याला ताकद दिली असे श्री. पवार म्हणाले. १९३० च्या सत्याग्रहात श्री. जेधे यांना अटक झाली होती .१९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीतही त्यांनी भाग घेतला यावेळीही त्यांना अटक झाली होती असे श्री. पवार म्हणाले.

तात्यासाहेब जेधे यांच्या सामाजिक चळवळींच्या विविध टप्प्यांचा मागोवा घेताना, त्यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात महाराष्ट्राला सामाजिक समतेच्या उंबरठ्यावर आणल्याचे आपणास दिसते. महाराष्ट्राच्या या सामाजिक चळवळीचा गौरवशाली इतिहास लक्षात घेऊन प्रत्येकाने समाजिक समतेचे मूल्य अंगीकारून  महाराष्ट्र व देशाच्या विकासात योगदान द्यावे असेही आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.

०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.११६/दिनांक २१.०४.२०२१