आठवडा विशेष टीम―
मुंबई दि, 21 : राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांप्रति सांत्वना व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनामार्फत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. यापुढे राज्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी. सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत राहील, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.