पालकमंत्र्यांची मालखेड येथील रोपवाटिकेला भेट; रोजगार हमी योजनेच्या कामाची केली पाहणी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

यवतमाळ, दि. 21 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नेर तालुक्यातील मालखेड येथे वन विभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, वनविभागाचे श्री. बदकुले, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे पोलिस निरीक्षक डी.एम. घुगे, मनोज नाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्व पावसाळी कामे त्वरित सुरू करून जुलैमध्ये वृक्षारोपणाची कामे सुरू होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड ही एक चळवळ असून ग्रामपंचायत, रोजगार हमी योजना, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व इतर सर्व विभाग वृक्षारोपण करू शकतात. त्यामुळे रोपांची संख्या कमी पडता कामा नये. यावेळी त्यांनी मजुरांचे मस्टर तपासणी केली. तसेच करंजी, जांभूळ, सीसम, आवळा आदी रोपट्यांची पाहणी केली. रोपवाटिकेच्या परिसरात आवळ्याचे वृक्षारोपण केले.

मालखेड येथील रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 50 हजार लहान रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या कामावर 7.20 लक्ष रुपयांपैकी 3.19 लक्ष रुपये खर्च करण्यात आले असून निर्माण झालेल्या मनुष्य दिवसांची संख्या 1410 आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली.