जळगाव जिल्ह्यातील अपघातात सोयगाव तालुक्यातील दोन तरुण ठार

सोयगाव,दि.२४(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):जळगाव येथे लग्नमंडपाचे साहित्य खरेदीसाठी जात असलेल्या घानेगाव तांडा ता.सोयगाव येथील दुचाकीस्वारांना भरधाव येणाऱ्या डंपरने धडक दिली.या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना शनिवारी शहापूर ता.जामनेर गावाजवळील वळण रस्त्यावर घडली.
सोयगाव तालुक्यातील घानेगाव तांडा ता.सोयगाव येथील योगीराज किसान राठोड(वय ३०)श्याम विष्णू जाधव(वय १८)हे दोघे मंडपाच्या साहित्य खरेदीसाठी जळगावला दुचाकीने जात असतांना समोरून भरधाव येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने योगीराज राठोड हा जागीच ठार झाला.

तर श्याम जाधव याचा जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला.यावेळी जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन देऊळगाव गुजरीकडे जात असतांना त्यांनी घटनेची माहिती जामनेरला दिल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचली.योगीराजचा जागीच मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.तर जखमी अवस्थेत जळगावला हलविण्यात आले उपचार सुरु असतांना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.उपनिरीक्षक विकास पाटील पुढील तपास करत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.