आग दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार

आठवडा विशेष टीम―

पालघर. दि. 23 : विरार येथील  विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

आगीचे वृत्त समजताच पालकमंत्री श्री. भुसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

जखमी रुग्णांची योग्य काळजी प्रशासन घेणार; दुर्दैवी घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात पुढे घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत तसेच या घटनेतील जखमींची जिल्हा प्रशासन योग्य काळजी  घेत आहे असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विजय  वल्लभ  हॉस्पिटल, तिरुपती फेज 1. विरार (प.) या 4 मजली रुग्णालयामध्ये रात्री 3 :13 च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागून 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पालकमंत्री श्री. भुसे घटनास्थळी दाखल झाले.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते.. सदर रुग्णालयात एकूण 90 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आज दि. 23 एप्रिल,  रोजी पहाटे 3:13  मिनिटांनी रूग्णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू युनिटमध्ये एसी स्पार्क होऊन ब्लास्ट झाल्यामुळे सदर आयसीयु युनिट मधील यंत्रणा ठप्प होऊन तेथे आग लागली. महानगरपालिका अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी  जाऊन  आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णालयातील  आयसीयू युनिटमध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते यापैकी 13 रुग्णांना व्हेन्टिलेटर्स व इतर रुग्णांना ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली होती असल्याने ते हालचाल करू शकले नाही . घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांमध्ये 5 महिला व 8 पुरुष आहेत. यामध्ये उमा सुरेश कनगुटकर (63 वर्षे महिला) ,निलेश भोईर (35 वर्षे पुरुष), पुखराज वल्लभदास वैष्णव (68 वर्षे पुरुष) , रजनी आर. कुडू (60 वर्षे महिला), नरेंद्र शंकर शिंदे (58 वर्षे पुरुष), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (63 वर्षे पुरुष), कुमार किशोर दोशी (45 वर्षे पुरुष), रमेश टी उपयान (55 वर्षे पुरुष), प्रवीण शिवलाल गोडा (65 वर्षे पुरुष), अमेय राजेश राऊत (23 वर्षे पुरुष), शमा अरुण म्हात्रे (48 वर्षे महिला), सुवर्णा एस.पितळे (64 वर्षे महिला), सुप्रिया देशमुख (43 वर्षे महिला) या रुग्णांचा समावेश आहे. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्यात आले आहे.असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.