महर्षी शिंदे यांचे लेखन महाराष्ट्राचा अमूल्य वैचारिक ठेवा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, २३ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली लेखन निर्मिती ही महाराष्ट्राच्या वैचारिक वाङ्मयाचा मोठा ठेवा असून यातील विचार दृष्टीमधून आजच्या जगण्यातील कळीचे प्रश्न सोडविण्याची प्रेरणा मिळते, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ रणधीर शिंदे यांनी आज मांडले.

थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जंयतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘महर्षी शिंदे यांच्या विचारविश्वाची प्रस्तुतता’  या विषयावर ३४ वे पुष्प गुंफताना डॉ. शिंदे  बोलत होते.

समाजकार्य व लोकचळवळींसाठी महर्षी शिंदे यांनी  वैचारिक संशोधनात्मक आणि ललित वाङ्मयाची निर्मिती केली. अखंड भारतव्यापी सामाजिक सुधारणांसाठी  देशभर प्रवास करून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला पोषक ठरेल अशी गुणसंपन्न लेखन निर्मिती केली. त्यांचे हे लेखन महाराष्ट्राच्या वैचारिक वाङ्मयाचे संचित म्हणून विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात नैतिक व सदृढ बळ देण्याचा वैचारिक वस्तुपाठच देते असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. महर्षी शिंदे यांच्या वैचारिक वाङ्मयाचे सूत्र धर्मविषयक विचार, अस्पृश्यताविषयक विचार, शेतकरी प्रश्नासंबंधी विचार आणि बुध्द विचारावर आधारित आहे,असे ते म्हणाले.

महर्षी शिंदे यांचे धर्म विचार, ईश्वर विषयक विचार हे मानवी जीवन विवेकशील बनविण्याचे होते. परंपरा, रूढीप्रियता यांस त्यांच्या धर्म विचारामध्ये थारा नव्हता. त्यांच्या धर्म विचारांवर ब्राह्मधर्माचा एकेश्वरी उदारमतांचा प्रभाव होता. धार्मिक जीवन व ऐहिक जीवन यांच्यात परस्पर संगती सांगणारा त्यांचा धर्म विचार होता. युरोपात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास केला यामधून देखील एक वेगळा धर्मविचार त्यांच्यामध्ये आला. ‘महर्षी शिंचे यांचे लेख, व्याख्यान आणि उपदेश’ हा १९१२ मध्ये प्रकाशित त्यांचा ग्रंथ तसेच  ‘धर्म जीवन आणि तत्वज्ञान’ या ग्रंथांमध्ये त्यांचे धर्मविचार आपल्याला दिसून येतात व त्यांचे हे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

महर्षी शिंदे यांच्या वाङ्मयाचा महत्त्वाचा भाग म्हणून त्यांचे अस्पृश्यता विषयक, जाती निर्मूलन विषयक विचार होय. त्यांनी आयुष्य भर अस्पृश्यता निर्मूलनाचे कृतिशील कार्य केले भारतीय निराश्रित सहायकर मंडळाच्या माध्यमातून या विषयीचे विचार मांडले व या विचारांचा प्रसार केला. 1933 मध्ये महर्षी शिंदे यांनी लिहिलेला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा धाडसी प्रबंध ग्रंथ ठरला. राष्ट्रीय प्रवाहाला अस्पृश्य धारेची महती कळायला महर्षी शिंदे यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे ठरले असून या कार्यास संस्थात्मक चौकट देण्यासाठी त्यांनी मूलभूत स्वरूपाचे कार्य केले असे त्यांनी सांगितले.

शेतकरी प्रश्नासंबंधी महर्षी शिंदे यांनी मूलभूत मांडणी केली. त्यांनी महाराष्ट्रभर शेतकरी परिषदा घेऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या गुलामीबद्दल, त्यांच्या विषमतेबद्दल विचार मांडले या परिषदांमधून त्यांनी केलेली अध्यक्षीय भाषणे हा मोठा वैचारिक ठेवा आहे. पहिल्या शेतकरी आत्महत्येचा संबंध महर्षी शिंदेच्या वैचारिक लेखनात दिसून येतो. शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कासाठी संघटना स्थापन कराव्या , शेतकरी आणि कामगारांचे संयुक्त संघ स्थापन व्हावे असे विचार महर्षी शिंदे यांनी मांडले होते असे त्यांनी सांगितले.

बुध्द विचार हा महर्षी शिंदेच्या वैचारिक चिंतनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1900 सालापासून महर्षी शिंदे हे बुध्द विचाराकडे आकृष्ट झाले होते. मँचेस्टर येथे प्रोफेसर कारपेंटर यांच्याकडे उदार धर्माचे शिक्षण घेत असताना बौध्द धर्म आणि पाली भाषेचे शिक्षण त्यांनी घेतले होते. बौध्द धर्मातील उदारमूल्य आणि  गौतमबुध्दाच्या सहिष्णुतावादी तत्वसरणीने ते प्रभावित झाले होते. ‘मी बौध्द आहे असे विधान त्यांनी 1927 मध्ये केले होते, आणि बौध्द धर्माचा जीर्णोध्दार हा लेख त्यांनी लिहिला होता व या विषयावर त्यांनी भाषणे दिली असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

महर्षी शिंदे यांचा जन्म, त्यांच्यावर घरातून झालेले वारकरी संप्रदायाचे संस्कार पुढे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी केले कार्य अस्पृश्यता निवारणाचे कार्य आदिंवरही डॉ. शिंदे यांनी यावेळी प्रकाश टाकला.आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महर्षी शिंदे यांनी अमूल्य असा वैचारिक ठेवा दिला असून  आजच्या नवीनतम महाराष्ट्राला  यातून बळ मिळेल असा विश्वास, डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

०००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१२०/दिनांक २३.०४.२०२१