आठवडा विशेष टीम―
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 : जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मर्यादा असतानादेखील चांगल्या सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. ऑक्सिजनची गरज जिल्ह्यातच पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रकल्पदेखील उभारण्यात येत आहे. याचा लाभ कोरोना बाधितांना होईल याबाबत विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड .के.सी.पाडवी यांनी केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार त्वरित रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यात यावी. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी कोणत्याही प्रकारची औषधे किंवा सुविधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करून वाढीव खाटांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. संचारबंदी कालावधीतील नियमांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे आणि पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिक अनावश्यक बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. भाजी विक्रेत्यांना विविध ठिकाणी जागा निश्चित करून द्यावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. प्रशासनातील विविध विभाग चांगले काम करीत आहे. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रकृतीची देखील काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, असे ॲड.पाडवी म्हणाले.
विरारची घटना वेदनादायी आणि दु:खद आहे. अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालयांना विशेष दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात याव्यात. रुग्णांच्या उपचारासोबत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालय सुरक्षा उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.