जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे पोलिसांना स्पष्ट आदेश

आठवडा विशेष टीम―

सातारा दि. २५ (जिमाका) : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलीसांना यावेळी केल्या.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरील मालखेड येथील चेक नाक्याची परवा पहाणी केल्यानंतर काल सातारा व पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे हद्दीवरील  सारोळा येथील चेक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्थेची व कडक पोलीस बंदोबस्ताच्या अंमलबजावणीची त्यांनी पाहणी केली.यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,आमदार मकरंद आबा पाटील, हे ही उपस्थित होते.

सारोळा चेकपोस्टवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना दिली. त्यानंतर देसाईंनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांना चेकनाक्यावरून फोन लावत पुणे हद्दीवरील चेक नाक्याचीही माहिती घेतली.

यावेळी गृह राज्यमंत्री.शंभूराज देसाई म्हणाले राज्यात जिल्ह्याच्या नाकाबंदीची पोलिस खात्याकडून योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा रात्री आठ वाजल्यापासून राज्यातील पोलिस दल अलर्ट आहे. संपुर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात असल्याने वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. जनतेनेच आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेवून प्रवास करावा.पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेनेही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी पोलीसांच्या प्रकृतीची काळजी शासन घेत आहे जनतेनेही स्वत:ची त्यांच्या कुटुंबाची व पोलीसांची काळजी घेतली पाहिजे. असेही आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.

                              000