ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँटस् उभे करण्यावर भर – पालकमंत्री जयंत पाटील

आठवडा विशेष टीम―

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधाची कमतरता भासत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनामार्फत बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. बेड्स जरी उपलब्ध झाले तरी रूग्णांना ऑक्सिजन मिळणे हे महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन पुरविण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन प्लँटस् उभे करता येतील का याबाबत जिल्हा प्रशासनाने भर द्यावा. याबरोबरच ऑक्सिजन बाहेरून आणण्यासाठी टँकर्स उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित उपचाराखाली असणाऱ्या रूग्णांची संख्या 10 हजाराहून अधिक झाली आहे. यामध्ये दररोज नवीन एक हजारहून अधिक रूग्णांची भर पडत आहे. परिस्थिती चिंताजनक आहे त्यामुळे  सर्व यंत्रणा सज्ज करा. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रूग्णालयात व्यवस्था करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. काही दिवसांनंतर बेड्स अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेड्स मध्ये वाढ करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्तांनी, ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यवस्था करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्वात मोठी अडचण ऑक्सिजनची असून गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा प्रयत्नपूर्वक सुरळीत ठेवण्यास यश आले आहे. परंतु जशी कोरोना बाधितांची संख्या वाढेल तसा पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत ताण वाढण्याची शक्यता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्र शासनाच्या हातात गेलेला असल्यामुळे व सर्व उत्पादकांवर केंद्र शासनाचे नियंत्रण असल्यामुळे तेथून महाराष्ट्राला जो रेमडेसिवीरचा पुरवठा होत आहे त्यातील काही भाग आपल्या जिल्ह्याला येत आहे व तो अपुरा पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला अधिक पुरवठा व्हावा यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हाला प्राप्त होणारा ऑक्सिजन रूग्णालयांनी आवश्यकतेनुसारच वापर करावा. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून याचे ऑडिट करण्यात यावे. सद्यस्थितीत जे बेड्स उपलब्ध आहेत ते कदाचीत पुढील चार – पाच  दिवसात संपण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका क्षेत्रात आणखी बेड्स वाढविण्याचा प्रयत्न सुरू करा. बेड्स वाढविले की ऑक्सिजनही वाढवावा लागतो. त्या दृष्टीने सतर्क राहून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

कोरोना लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांच्या ठिकाणांना प्रसंगानुरूप कंटेनमेंट झोनमध्ये परावर्तीत करावे. या ठिकाणच्या व्यक्ती बाहेर पडू नयेत याबाबत कडक बंदोबस्त करण्यात यावा. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतींनी ग्रामसमित्या सक्रीय कराव्यात. प्रसंगी कठोर निर्णय घेवून कोरोनाचा फैलाव होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात. यासाठी लागणारी मदत जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी  18 वर्षावरील सर्वांनाच आता कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने याबाबतचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. कोरोना बाधितांची संख्या कमी करावयाची असेल तर लोकांनी घरात राहून कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रीय करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सेस, आशा वर्कर्स यांना थर्मल गन, ऑक्सिमीटर यासारख्या ज्या आरोग्य विषयक सामुग्री पुरविण्यात आल्या आहेत याबाबतची तपासणी करून त्या कार्यरत आहेत किंवा कसे याबाबत प्राथम्याने जाणून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी या साधनसामग्री नादुरूस्त असतील त्या ठिकाणी त्या तातडीने दुरूस्त करून देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याबाबतची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात यावी. कोरोना रूग्णालये कार्यान्वीत आहेत अशा रूग्णालयातील ऑक्सिजन व व्हेंटीलेटर, फायर यंत्रणा याची तातडीने तपासणी झाल्यास संभाव्य अपघात घडणार नाहीत, असे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लसीकरण हे प्रत्येक गावात पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अद्यापही लसीकरण पोहोचले नाही अशा गावांमध्ये लसीकरण करण्याबाबत प्रशासनाने करावी. रेमडेसिवीअर औषध हे उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने दैनंदिन पाठपुरावा करावा, असे आदेश दिले.

मिरज येथील महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महानगरपालिकेने मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी 132 ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फार मोठी मदत सांगली जिल्ह्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येला झाली आहे. या ठिकाणी 200 बेड्स पर्यंतची वाढ होवू शकते अशी व्यवस्था महानगरपालिकेने निर्माण केली आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात जर रूग्णांची संख्या वाढली तर त्या रूग्ण संख्येला कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनेटेड बेड्स वाढविण्याचे काम सुरू असून यामध्ये आणखी वाढ करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. पॉझिटीव्ह आहे परंतु घरी रहायला जागा नाही अशा रूग्णांसाठीही येथे महापालिकेने सोय केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने सर्व खानपानाची चांगली सोय उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000000