प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोरोनाविरूद्धची लढाई आता लोकचळवळ व्हावी

आठवडा विशेष टीम―

रेमडेसिवीर म्हणजे अंतिम पर्याय नाही त्यामुळे गरज असेल तरच वापरा

नाशिक: दि. २४ (जिमाका वृत्त) : कोरोनाच्या लढ्यात आता नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी ही लढाई आता लोक चळवळ व्हायला हवी; नागरिकांनीही आता सजग राहून आपल्या परिसरातील रुग्णांची माहिती संबधित विभागाला देण्यात यावी. तसेच रेमडेसिवीर हे रुग्ण वाचविण्यासाठीचे अंतिम पर्याय असलेले औषध नाही. त्यामुळे गरज असेल तरच त्याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी  निखिल सैंदाणे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, बीडीओ डॉ.उन्मेष देशमुख, संदीप कराड, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या साखळीमध्ये कितपत फायदा होतोय याचा अंदाज आपण घेतो आहोत. गृहविलगिकरण करण्यात आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी होत नसेल तर त्यांना कोविड सेंटरला हलविण्यात यावे. तसेच त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. गृहविलगिकरणात राहणाऱ्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचीही नियमित तपासणी करण्यात यावी. विलीगिकरण सेंटरची आवश्यकता असेल तर सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. गावपातळीवरही टेस्टिंगची संख्या वाढविण्यात येऊन रुग्णांचे विलगिकरण करण्यात यावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
ऑक्सिजनची कमतरता असल्याने सिलेंडर नियमित भरून ठेवण्यात यावेत. ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत योग्य नियोजन करण्यात यावे. मृत्युदर घटविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत. कंटेन्‍मेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात यावे. मोठ्या बाजारपेठा सुरू राहिल्यास रुग्णसंख्या अधिक वाढत असेल तर किमान आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात याव्यात. त्यांना आवश्यक त्या परवानग्या देण्याबाबत दूरध्वनीद्वारे पणन सचिवांशी चर्चा करून त्यांना निर्देश यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला व निफाड तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आढावा घेऊन नियमित टँकर सुरू ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना  दिले आहेत.
00000000000