महाराष्ट्र राज्य

पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या ; विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले

आठवडा विशेष मराठी वृत्तसेवा - पिंपरी चिंचवड : दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं.

विहिरीकाठी चपला आढळल्या

तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला तिघांच्या चपला आढळल्या. मोठ्या माणसाच्या चपलांसोबत लहान मुलींच्या चपला दिसल्या. त्याच्याबरोबर मोबाईल आणि पैसेही पडलेले असल्याचे दिसून आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

तिहेरी आत्महत्येच्या घटनेने तळेगाव ढमढेरे गावात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ बापलेकींच्या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. तर पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

कोरोनाच्या भीतीने शिक्षकाची आत्महत्या

कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका शिक्षकाने तापी नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं. या शिक्षकाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. मात्र कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्षकाच्या नातेवाईकांनी दिली.

कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन गळफास घेतला होता. विशेष म्हणजे डायरीत 22 नोव्हेंबर 2021 या पानावर त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या श्रवणाच्या त्रासाचा उल्लेख केला आहे.

 

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.