‘मराठी साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर निवृत्त सनदी अधिकारी तथा लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांचे उद्या व्याख्यान

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. २५ : निवृत्त सनदी अधिकारी, लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे “मराठी साहित्य आणि लोकशाही -१९६०ते२०२०” या विषयावर उद्या २६ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३७ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता लक्ष्मीकांत देशमुख हे १९६० ते २०२० या काला‍वधीतील घटना ,संदर्भांच्या आधारावर श्री देशमुख हे ‘मराठी साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या विषयी

उस्मानाबाद जिल्हयातील मुरम हे श्री लक्ष्मीकांत देशमुख हे यांचे जन्मगाव. त्यांनी एमएस्सी आणि एमएची पदवी संपादन केली तसेच एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले. सध्या ते आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे  विश्वस्त म्हणून कार्य पाहत आहेत. “मराठीच्या भल्यासाठी” या मराठीच्या विकासासाठी काम करणाऱ्या मंचाचे कार्याध्यक्ष म्हणून ते जबाबदारी पाहत आहेत.

श्री देशमुख यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी म्हणून आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी राबविलेले महत्वाकांक्षी कार्यक्रम व उपक्रम उल्लेखनीय ठरले पुढे ते सचिवपदाहून निवृत्त झाले.

प्रशासनात उत्तम कार्य करीत असतानांच त्यांनी स्वत:तील लेखक जागा ठेवला व विविध विषयांवर लेखन केले. आजवर तीन इंग्रजी पुस्तकांसह त्यांची एकूण ३१ पुस्तके प्रकाशित आहेत. यात “इंकीलाब विरुद्ध जिहाद”, “अंधेरी नगरी”, “हरवलेले बालपण”, “ऑक्टोपस” आणि  “यंग इंडियाचा ग्रुपसेल्फी” या कादंबऱ्यांचा समावेश आहे. “पाणी!पाणी!!” , “गाव विकणे आहे” , “सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी”, “मृगतृष्णा”, “अंतरीच्या गुढगर्भी”. “माणूस नावच एकाकी बेट”, ” नंबर वन”आदी  त्यांचे दहा कथासंग्रह प्रसिध्द आहेत. “बखर भारतीय प्रशासनाची”स्त्री सुक्त””मधुबाला ते गांधी” व “प्रशासननामा””कैफी आझमी: जीवन आणि शायरी”आदी त्यांची संकीर्ण पुस्तके प्रकाशित आहेत.

 २०१८ मध्ये बडोदे येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  मानाचे अध्यक्षपद त्यांनी  भूषविले आहे . याशिवाय  नांदेड येथे आयोजित ३६वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड, ग्रामीण साहित्य संमेलन विटा आणि निसर्ग साहित्य संमेलन अब्दुल लाट आदि  संमेलनानाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

प्रशासनातील आणि साहित्यातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय सेवेत मानाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे .

साहित्यातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पुणे)  पाच  पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे दोन  व इतर साहित्य संस्थांच्या २४ पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

सोमवारी, 26 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.