महाराष्ट्र राज्य

महाविकासआघाडी मध्ये मोठ्या हालचाली; सुप्रिया सुळे सोनिया गांधीना भेटल्या

मुंबई: आठवडा विशेष मराठी वृत्तसेवा - परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. या धक्क्यातून सावरत आता सर्व नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. 

या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तत्पूर्वी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे नेते उपस्थित होते. या बैठकीत रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांसंदर्भात केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

‘दूध का दूध, पानी का पानी करावे!’

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांचा आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करुन दूध का दूध, पानी का पानी करावे!, असे म्हटले आहे.

मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते, असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता एकत्रपणे लढायला पाहिजे’

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही, अशी खंत बोलून दाखविली. मात्र, आता भाजपला हल्ला परतवून लावण्यासाठी आपण एकत्रपणे लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सांगितले. त्यामुळे आता महाविकासआघाडी काय करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.