आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार निधीचा वापर करण्याच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

सोलापूर, दि. २५ : अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केल्या.

अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. अक्कलकोट तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सभापती सुनंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

बैठकीत सुरवातीस उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी अक्कलकोट मधील परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील 131 पैकी 21 गावांत सध्या एकही कोरोनाचा पेशंट नसल्याचे सांगितले.

अक्कलकोट मधील नागरिक उपचारासाठी सोलापूर शहरात जातात. मात्र तरीही अक्कलकोटमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी करण्यासाठी आमदार निधीचा वापर करावा, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याचबरोबर भक्त निवास आणि अन्नछत्र निवासात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. संभाव्य रुग्णांची संख्या वाढवणार हे गृहीत धरुन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी ठेवा. तालुक्यातील लसीकरणाचा वेग कायम ठेवावा. 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. यासाठी नियोजन केले जावे, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, शिक्षणाधिकारी संजय राठोड, डॉ. अशोक राणे आदी उपस्थित होते.