लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू नये यासाठी दक्षता घ्या

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि.26 :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करीत स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. तसेच लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिले.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोविडबाबत श्री. देशमुख यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत वंजारी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता तसेच  संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळेच आज कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. मेयोतील कोरोना संसर्गातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास 90 टक्के आहे. ही बाब समाधानकारक आहे. असे सांगत श्री. देशमुख म्हणाले, कोविड संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास घरगुती उपचार करण्यात वेळ न दडवता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. बरेचदा पेशंट अत्यव्यस्थ झाल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांवर मर्यादा पडतात. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यापुढे रेमिडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. गरजेप्रमाणे रेमिडेसिवीर औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीही ठराविक औषधाचा आग्रह करु नये. येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गातून बाहेर पडलेल्या रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुदानातून मेयो येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय विभागासमोर खूप आव्हाने आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच नर्सिंग स्टाफची पदभरती लवकरच करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

डॉ. केवलिया यांनी मेयोमधील कोरोना उपचारासंबंधीची माहिती यावेळी दिली. सध्या येथे कोरोना रुग्णांसाठी 600 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 100 रुग्णांसाठी डोझी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आणखी 100 डोझी यंत्रे येथे लवकरच बसविण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची माहिती देण्यासाठी माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सध्या 166 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून त्यापैकी 143 कोविड रुग्णांसाठी तर उर्वरित 23 नॉन कोविड व सारी रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्सची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटी तत्वावर बायोमेडिकल इंजिनिअरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीनंतर श्री. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.