गरजूंना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 27 : कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा, यासाठी राज्यात सर्वत्र टाळेबंदी तसेच रात्रीच्यावेळी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याकरिता मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. वंचित व गरजू कुटुंबांना संचारबंदीत धान्य उपलब्ध व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित व गरजूंसाठी सातत्याने कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

या निर्णयानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये 2 रुपये प्रतिकिलो गहू व 3 रुपये प्रतिकिलो तांदूळ याप्रमाणे अन्नधान्य खरेदी करीत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांना देय असलेले अन्नधान्य मोफत देण्यासंदर्भात सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत.

माहे एप्रिल व मे या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी यापूर्वी नियमित मासिक नियताद्वारे निश्चित करण्यात आलेल्या परिमाणानुसार अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.  माहे एप्रिल व मे महिन्यात जे लाभार्थी रास्त भाव दुकानामध्ये अन्नधान्य खरेदी करण्यास येतील, त्या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्याने माहे एप्रिलसाठी त्या लाभार्थ्यास देय असलेले अन्नधान्य यापूर्वीच खरेदी केले असेल, त्या लाभार्थ्यास माहे मेसाठी देय असलेले अन्नधान्य (अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य) मोफत देण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांना एप्रिल 2021 चे देय अन्नधान्य खरेदी केले नसेल त्यांना एप्रिलसाठी देय असलेले अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे.

तसेच, प्रत्येक लाभार्थ्यास एकाच वेळी एक महिन्यासाठी मोफत अन्नधान्य य एका महिन्यासाठी खरेदी करावयाचे अन्नधान्य दोन्ही एकत्रितरित्या मिळण्याची सुविधा पॉस मशिनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी केले आहे.

00000