आठवडा विशेष टीम―
आरोग्य विभागाकडून निधीला प्रशासकीय मान्यता
अमरावती, दि. 29 : आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांसाठी नवजात अर्भक ॲम्ब्युलन्स व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी सुमारे एक कोटी रूपयांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात नवजात अर्भक वाहिकांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे वाहिका उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनंती केली होती व त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्यामुळे मेळघाटात तत्काळ ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने निधीला मंजुरी दिली आहे.
आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन केलेल्या मागणीनुसार निधी उपलब्ध होत आहे. नंदुरबार व अमरावती जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन व नाशिक येथे एक रुग्णवाहिका व उपकरणासाठी निधी मंजूर आहे. त्यामुळे धारणी व चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम भागातील सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होईल. त्याचबरोबर, वैद्यकीय सेवेसाठी महत्त्वपूर्ण उपकरणेदेखील प्राप्त होणार आहेत. यानंतरही मेळघाटात आवश्यक त्या सर्व ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
रुग्णवाहिकेबरोबरच मॉनिटर, बेबी वॉर्मर, सिरींज पंप, ओ टू हूड, ट्रान्सपोर्ट इनक्युबेटर, कांगारू बॅग, इन्फ्युजन पंप, संक्शन मशिन, ग्लुकोमीटर, स्ट्रेचर विथ पोर्टेबल ऑक्सिजन माऊटिंग, पोर्टेबल ओ टू सिलेंडर यासह उपचारासाठी आवश्यक औषधे, साहित्य व उपकरणे उपलब्ध असणार आहे. अशा विविध अद्ययावत साधनांनी युक्त असलेली रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने दुर्गम भागात गतिमान उपचाराला चालना मिळणार आहे.
मनुष्यबळाचे नियोजन करा
मेळघाटात अद्ययावत साधनांनी युक्त ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत आहेत. त्या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. त्यासंबंधीचे नियोजन वेळेत करावे. त्याचप्रमाणे, धारणी व चिखलदरा तालुक्यात यापुढेही आवश्यक तिथे रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी परिपूर्ण माहिती सादर करावी. त्यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मेळघाटातील दुर्गम भागातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी नुकताच दौरा करून जनसामान्यांशी संवाद साधला व तेथे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासह रोजगार व पेयजलाशी संबंधित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विविध योजना- उपक्रमांचे नियोजन प्रशासनाकडून होत आहे.
00000