प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

बारामती दि. २८ : बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी  टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ‘कोरोना’ प्रतिबंधित लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गट नेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे शासकीय कार्यालयात व इतर खासगी आस्थापनेत ५० टक्के उपस्थितीमध्ये काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या कामावर तसेच विकास कामांवर परिणाम होणार नाही, याचे नियोजन करावे. ऑक्सीजन बेडची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण देण्याच्या सूचना आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या लसीकरणाकरिता केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत, यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी शासनाच्या नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीची  कमतरता भासणार नाही,  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनीही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

 

फिरत्या चित्ररथाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी

 जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव  संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनगागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता चित्ररथ) तयार केले आहेत. सदर चित्ररथाद्वारे  बारामती तालुक्यात सध्या  प्रसिध्दी करण्यात येत आहे,  त्याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी डॉ. मनिष गायकवाड यांनी चित्ररथाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.

०००

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.