आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि २९ : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.
साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
000