अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील भतानवाडी ग्रामपंचायतीने कोणत्या ही शासकीय निधी वा मदतीविना सुमारे ४ हजार वृक्षरोपांचे संगोपन व संवर्धन केले आहे.मागील अनेक महिन्यांपासून स्वखर्चाने वृक्षसंगोपन आणि पर्यावरण संवर्धन करून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर नवा आदर्श ठेवला आहे.भविष्याकरीता वातावरणातील नैसर्गीक ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि वृक्षसंवर्धनासाठी गावचे प्रयोगशिल युवक ज्ञानदेव भताने यांनी पुढाकार घेतला आहे.ज्ञानदेव यांच्या पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवड व संगोपन या कार्याचे समाजाच्या सर्वच क्षेञांतून सातत्याने कौतुक होत आले आहे.
गावाचा कायापालट करण्याचे नुसते स्वप्न पाहून जमत नाही.तर त्यासाठी गावक-यांचे संघटन,जबाबदारीचे वाटप आणि नेमके काय करायला हवे हे लक्षात आले पाहीजे. भविष्याकरीता वातावरणातील नैसर्गीक ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी भतानवाडी गावचे प्रयोगशिल युवक ज्ञानदेव भताने यांनी सन २०१९ पासून वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी वृक्ष संगोपनाचे महत्त्व पटवून दिले.त्याला यश आले व ग्रामस्थांना सोबत घेऊन जुलै-२०१९ मध्ये भतानवाडी येथील गायरान जमिनीवर लिंब (११५०),करंज (१६३०),शिसव (४५०),आवळा (४१०),सिताफळ (२००),चिंच (७०), रामफळ (५०),वड (20),पिंपळ (२०) अशी एकूण तब्बल ४ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.यासाठी तत्कालीन वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या योजनेंतर्गत अंबाजोगाई येथील वनविभागाचे तत्कालीन अधिकारी वरूडे,नागरगोजे तसेच परळी येथील गित्ते,सामाजिक वनीकरणचे मोहीते यांनी ज्ञानदेव यांना रोपे उपलब्ध करून दिली होती.तर यातील ५६ चिंच वृक्षरोपे ही रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांनी भेट दिली आहेत.आज ही सर्व झाडे दीड ते दोन वर्षे वयाची आणि अंदाजे ६ ते ७ फुट उंचीची झालेली आहेत.वृक्ष जगविण्यासाठी पाणी, खड्डा काढणे,लागवड, आळे करणे,खुरपणी, खत देणे,पाण्याची मोटार,पाईपलाईन, वीज बील,मजुरांचा पगार,वाहतुक,वृक्ष संगोपन आदी बाबींवर भतानवाडी ग्रामपंचायतीने स्वनिधीतून जवळपास ६ ते ७ लाख रूपयांहून अधिकचा खर्च केलेला आहे.तर वृक्ष संगोपनासाठी ज्ञानदेव भताने यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न हे सुरूच आहेत.यापूर्वी विठ्ठलराव भताने यांचे मार्गदर्शनाखाली सन २०१६ पासून पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सक्रिय सहभाग आणि मागील वर्षी समृध्द गांव स्पर्धेत पाञ असलेल्या २८ गावांमध्ये भतानवाडीचा समावेश झाला होता. परंतू,मागील वर्षांत कोरोना (कोवीड-१९) प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही स्पर्धा पुर्ण होवू शकली नाही.तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत भतानवाडीने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेसाठी मानवलोकचे कार्यवाह अनिकेतजी लोहिया, भारतीय जैन संघटना (बीजेएस) चे धनराज सोळंकी,निलेश मुथा तसेच ज्ञान प्रबोधनीचे प्रसाददादा चिक्षे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व मदत आणि भतानवाडी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक विठ्ठलराव भताने,मा.सरपंच सौ.रूख्मिणीताई भताने,सोनाबाई रामराव भताने यांचेसह सर्वच गावक-यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे युवक कार्यकर्ते ज्ञानदेव भताने यांनी सांगितले आहे.त्यामुळे वृक्षारोपण,संवर्धन आणि संगोपनासाठी अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी सारख्या अनेक ग्रामपंचायतींनी पुढे यावे.याकामी शासन व प्रशासनाने ज्ञानदेव भताने यांच्या सारख्या पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या युवकांना प्रोत्साहीत केले पाहिजे.महाराष्ट्रातील गाव-खेड्यात खरेच हिरवाई आणायची असेल तर वृक्ष लागवड मोहिमेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दशकांमध्ये देशासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्याला माणसांकडून मोठ्या प्रमाणात केली जाणारी वृक्षतोड ही कारणीभूत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हे अनिवार्य आहे.अंबाजोगाई तालुक्यात वृक्ष रोपांची लागवड, संगोपन व संवर्धनासाठी पुढाकार घेणा-या व उत्तम काम करणा-या ग्रामपंचायतींना,संस्था व व्यक्तींना पंचायत समिती व जिल्हा परीषद यांनी प्रोत्साहीत करण्यासाठी वॉटरकपच्या धर्तीवर रोख रकमेचे बक्षीस देणारी स्पर्धा सुरू करावी.५० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगविणा-या ग्रामपंचायती,संस्था व व्यक्तींना बक्षीसपाञ समजावे.तसेच रोप वाटिकांनाही भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.यातून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या पर्यावरण संवर्धन करण्यासाठी नक्की पुढे येतील.
कोविडमुळे कळाली ऑक्सिजनची किंमत
दररोज आपल्या कुटुंबातील,नात्यातील,मिञ परिवार आणि माहितीतले अनेकजण कोरोना संसर्गाने बाधित होत आहेत.अशा काळात काही रूग्णांची ऑक्सिजन लेवल कमी झाली,ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, ऑक्सिजन प्लांट कधी कार्यान्वित होईल.असे काहीसे शब्द ऐकावयास मिळत आहेत. एकिकडे ऑक्सिजनसाठी हजारो रूपये खर्चायला लोक आज तयार आहेत.तर दुसरीकडे हजारो वर्षांपासून वृक्ष आपणांस अगदी मोफत ऑक्सिजन पुरवित आहेत.यावरून मानवी जीवनातील ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात येत आहे.त्यामुळे केवळ सरकारला दोष देत बसण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षारोपण व त्याचे संगोपन करावे,आपण हे केले तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सीजन वाढून तो पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते.
―ज्ञानदेव भताने (सामाजिक कार्यकर्ते)