आठवडा विशेष टीम―
सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला ओळख मिळावी
मुंबई, दि. 10 : गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार संशोधन करावे, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नागपूर विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी विविध मुद्दे मांडले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी मांडलेले मुद्दे असे:
तेलंगणा येथून खतांचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी
- गडचिरोलीजिल्ह्याला खतांचे वितरण चंद्रपूर येथून केले जाते. सिरोंचा तालुका हा सुमारे 350 किमी मीटरहून अधिक अंतरावर आहे. अशावेळी या तालुक्याला खतांचा पुरवठा लगतच्या तेलंगणा येथून करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून वेळेची बचत होतानाच वाहतूक खर्चही कमी होईल.
मोहफुलांचा वापर पोषक आहारासाठी करावा
- गडचिरोली जिल्ह्यात मोह फुलाची मोठी आर्थिक उलाढाल होते. सुमारे 3 लाख मजूर मोहफुल गोळा करण्याचे काम करतात त्याद्वारे 1400 कोटी रुपयांची उलाढाल होते. अशा या मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता त्यातील औषधी आणि पोषण मुल्य यासंदर्भात झालेलं संशोधन लक्षात घेऊन या फुलांचा वापर पोषक आहारासाठी करण्यासाठी प्रयत्न करावेत. याठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
धान साठवणुकीसाठी गोदामांची संख्या वाढवावी
- गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ते साठविण्यासाठी गोदामांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. हा विषय कृषी संलग्न असल्याने गडचिरोली जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यात यावे. जेणेकरून धानाची साठवण क्षमता देखील वाढविता येणे शक्य होईल.
- गडचिरोली जिल्ह्यात वनसंपदा मोठी आहे. या जिल्ह्यात कृषि विभागाने विशेष नियोजन करून रासायनिक खते व औषधी विरहीत सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण गडचिरोली जिल्हा सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जावा अशी इच्छा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
- गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाची २७९ पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची मागणी पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी कली.
स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी
- गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाल्याचे सांगतानाच आपण स्वत: सहा शेतकऱ्यांना महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध करून दिली होती. त्याची लागवड यशस्वी होऊन शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी अशी सूचना श्री.शिंदे यांनी केली.
- कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जाभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच याठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील सुरू करण्यात यावा, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
000
…10.5.2021