वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

चंद्रपूर दि. १० मे : वन अकादमी येथे आजपासून सुरू झालेल्या 100 ऑक्सीजन खाटांमुळे जिल्ह्यातील कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे रूग्णालय उभारणीसाठी ज्याप्रमाणे उद्योजकांनी मदत केली त्याप्रमाणे इतर उद्योजकांनीदेखील  जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी आतापासूनच अद्यावत रुग्णालये उभारण्याण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर वन अकादमी येथे आज 150 कोविड बेड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले तर खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी फित कापली. यावेळी, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक रवींद्र साळवे,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची निकड लक्षात घेता 24 तास रात्रंदिवस काम करत केवळ 15 दिवसात येथे विद्युत, पाणी, पाईप लाईन, फिटिंग बेड व इतर अनुषंगिक साहित्य बसविण्यात आले आहे. अत्यंत कमी वेळेत जिल्हा प्रशासनाने रूग्णालय उभारणीचे काम पूर्ण केल्याने पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते व रूग्णालय उभारणीत महत्वाची भूमिका निभावणारे सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे यांची प्रशंसा केली आहे.

खासदार बाळू धानोरकर यांनी अत्यंत गरजेच्या वेळी हे हॉस्पिटल सुरू झाल्याने कोरोना रुग्णांना मोठा आधार मिळाला असल्याचे सांगितले, तर आ. प्रतिभा धानोरकर व आ. किशोर जोरगेवार यांनी देखील या रूग्णालयामुळे नागरिकांची ऑक्सीजन बेडसाठीची भटकंती मोठ्या प्रमाणात कमी होईल असे सांगितले.

या रुग्णालय उभारणीसाठी डब्ल्यू.सी.एल, धारीवाल पावर, आय.सी.आय.सी.आय, लोकप्रतिनिधी, आमदार किशोर जोरगेवार तसेच डब्ल्यू.सी.एल येथील ओव्हर बर्डन कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांनी बेड, मॅट्रेस, ऑक्सिजन गॅस पाईपलाईन, आयव्ही स्टॅन्ड, औषधी गोळ्या तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी मदत केली आहे. आय.सी.आय.सी.आय. बँकेकडून ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार असून तो एक महिन्यात कार्यान्वित होणार आहे. वन अकादमीतील कोविड केअर सेंटरशी संलंग्न असलेल्या या नवीन रूग्णालाची क्षमता 150 बेडची आहे व आज येथे 100 ऑक्सिजन बेड  व 15 आयसोलेशन बेड असे एकूण 115 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. उर्वरित 35 बेड लवकरच सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.