कोल्हापूरने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली दि. 10 मे : भारतीय चित्रपट सृष्टीला कलात्मक आणि तांत्रिक दर्जा प्रदान करण्यात कोल्हापूरचे महत्त्वाचे योगदान आहे खऱ्या अर्थाने कोल्हापुरने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला आहे, असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक प्रा.डॉ. कविता गगराणी यांनी केले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत कविता गगराणी यांनी “चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान” या विषयावर 43 वे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. गगराणी म्हणाल्या,  चित्रपटसृष्टी आणि कोल्हापुरचे योगदान या विषयाचा आवाका बघता याचे दोन भाग करावे लागतील. मराठी चित्रपटसृष्टीला आणि पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीला कोल्हापूरचे योगदान. यासह मुकपट आणि बोलपट असे दोन भाग करावे लागतील. मुकपटाचा कालखंड हा 1913 ते 1932 चा आहे. यामध्ये भारतातील पहिला मुकपट ‘राजा हरीशचंद्र’ हा दादासाहेब फाळके यांनी बनविलेला. तर बोलपटाचा 1932 पासून ते आजतगायतपर्यंतचा. मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करतानाही दोन भाग करावे लागतील 1932 ते 1960 आणि महाराष्ट्र निर्मिती नंतर 1960 पासून ते आजपर्यंत. मराठी चित्रपट सृष्टीचा धावता आढावा घेतल्यास 1932 ते 1960मध्ये बरेच प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीने केले. यामध्ये मनोरंजन, सामाजिक, वैचारिक विषयांवर अनेक मुकपट आणि बोलपट आलेत.  50 चे दशक मराठी चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे दिसते. 1953 मध्ये साने गुरूजीच्या कथेवर आधारित असणारा अत्रेने दिग्दर्शीत केलेला ‘श्यामची आई’ या चित्रपटास राष्ट्रपती पदकाचा सन्मान मिळाला. ‘महात्मा फुले’ हा ऐतिहासिक चित्रपटही अत्रेंनी दिला. 1959 ला अनंत माने यांचा ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण दिले.

या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग……. या गाण्यामध्ये जयश्री गडकर यांची अदा आजही प्रेक्षकांना घायाळ करते, असे डॉ. गगरानी म्हणाल्या. 70 च्या च्या दशकात आलेला ‘पिंजरा’ आणि ‘सोंगाड्या’ या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याच दशकात दादा कोंडके यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित केले होते. तर देवकीनंदन गोपाला, सिंहासन, जैत रे जैत,  सामना यासारखे वैचारिक सिनेमेही आलेत. महाराष्ट्र शासनाने 1975 मध्ये करपत्तीची योजना आणली. पुढच्या टप्प्यात करमणूक कर माफ केला. अलीकडे मराठी चित्रपटांना अनुदानही देण्यात येत आहे, असे ही डॉ. गगरानी यांनी सांगितले. 80 च्या दशकात कौटुंबिक विनोदी मराठी चित्रपटांचे होते. विनोदी चित्रपटांसह शापित, उंबरठा, मुलगी झाली हो, कळत-न- कळत, आक्रीत, अरे संसार संसार यासारखे चित्रपटही तयार झाले.

21 व्या शतकाच्या सुरवातील श्वास या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला ऑक्सीजन दिल्याचे दिसते.  यानंतर दहावी फ, पकपकाप, टिंग्या, वळू, किल्ला, कायदयाचे बोला, देऊळ, कोर्ट,  कासव, निशाणी डावा अंगठा, सुंभराण, बालक-पालक, मी शिवाजी राजे बोलतोय, वास्तुपुरूष यासारखे अनेक विविध विषय हाताळणारे त्यांच्या मांडणीमध्ये वैविध्य असणारे अनेक चित्रपट दिले.

‘फ्लॅशबॅक’ कोल्हापूर चित्रपट सृष्टीचे

फ्लॅशबॅक हे तंत्रच कोल्हापूरात विकसित करण्यात आले. यासह मराठी चित्रपट सृष्टीमुळे हिंदी चित्रपट सृष्टीला सामाजिक चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा दिली. मराठीमधील पहिला वास्तवादी चित्रपट म्हणून ‘सामाजिक पाश’ हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये फॅल्शबॅक तंत्र दाखविले होते. याची सुरूवात बाबुराव पेंटर यांनी केली.

बाबुराव पेंटरचे चित्रपट सृष्टीला अमुल्य योगदान कला महर्षी बाबुराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीचा घेतलेला ध्यास पुर्ण केला. बाबुराव पेंटर हे उत्तम चित्रकार आणि, तंत्र विशारद  होते. 1 डिसेंबर 1917 मध्ये त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली. या कंपनीचा ‘सैरंद्री’ पहिला कलात्मक चित्रपट होता. या चित्रपटांचे वैशिष्टये म्हणजे हा चित्रपट स्वत: पेंटर यांनी बनविलेला कॅमे-याने म्हणजे स्वदेशी कॅमे-याने चित्रित झालेला होता.  लोकमान्य टिळकांनी हा सिनेमा बघ‍ितल्यावर  पेंटरांना  ‘सिनेमा केसरी’ हा खिताब देऊन गौरव केला होता.

श्री. पेंटर यांचे चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदामध्ये कॉमे-याला गती देणारे स्पीड मीटर, फिल्म वाढण्यासाठी फिल्म केम‍िकलमध्ये असणारे पत्र्याचे ड्रम, वाळण्यासाठी असणारे लाकडी ड्रम प्रिटिंग मशीन, जॉयनिंग (संकलन) मशीन, र‍िफे्लक्टरचा वापर, कृत्रीम विजेच्या सहायाने चित्रिकरणाची सुरूवात त्यांनी केली.

चित्रपटांची जाहिरात करण्यासाठी पोस्टरर्सची सुरूवात बाबुराव पेंटर यांनी केली. पुढे जाहिरातींसाठी पोस्टर्स सर्वांनीच वापर केला. चेह-याचा नाजुकपणा दिसण्यासाठी गॉजचा वापर त्यांनीच सुरू केला.  यासह चमत्कृती दृश्यांचे चित्रिकरण करताना  मागच्या बाजुला पांढ-या पडदा लावून ते पात्र अंधातरी लटकून कॉमेराला गती देऊन फिरवून त्या चमत्कृती दृश्याला विशिष्ट इीफेक्ट दिला. ‘सिंहगड’ चित्रपटातील क‍िचक वधाचे चित्रिकरण इतके हुबेहुब होते की बॉम्बेच्या गव्हर्नर ने बाबुराव पेंटरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारणे दाखवा नोटीस जारी केले होते.  तेव्हा मुंबईला जाऊन ते चित्रिकरण कसे करण्यात आले हे सांगितले. या चित्रपटापासून सिनेसृष्टीत सेन्सार  सुरू झाले असे म्हणायला काही हरकत नाही. ‘सिंहगड’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत अनेक इतिहास रचलेच होते,  करमणुक कर देखील या सिनेमापासून सुरू झालेला आहे. पेंटर यांनी कला आणि तंत्रज्ञान प्रेमीची एक गुरूशिष्य पंरपराही निर्माण केली होती.व्ही.शांताराम यांनी 1 जुन 1929 ला प्रभात आणि पुढे राजकमल फिल्म कंपनी स्थापना केली.  या कंपण्यां माध्यमातून एकापेक्षा एक मराठी आणि हिंदी चित्रपट दिले. हिंदीतील पहिला बोलपट आलम आरा या चित्रपटात ज्यांनी प्रमुख भुमिका केली होती ते विठ्ठल भारगीर हे कोल्हापूरचे. पुढे त्यांना चित्रपट सृष्टीचा ‘इंडियन डगलस’ असे ओळखले गेले. वी.शांताराम यांनी ‘सैरंद्री’ चित्रपट बोलपट बनवून तो रंगीत पणे प्रदर्शित केला होता. हा प्रथम रंगीत चित्रपट ठरला. यासह या चित्रपटाची पहिली ध्वनी मुद्रिका ही वी.शांताराम  दिली आहे.

स्टुडियोची  नगरी कोल्हापूर.. 

काळाच्या ओघात बरेच बदल घडले, कोल्हापूरची कला पंरपरा अखंडीत राहवी आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी राजा छत्रपती राजाराम यांनी  कोल्हापूर सिनेटोन आणि त्यांच्या भगिणी  अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोनची सुरूवात केली. आताचे जयप्रभा आणि शालिनी सिनेटोन स्टूडियो कोल्हापूर संस्थांनामार्फत बांधण्‍यात आले.

भालची पेंढारकरांनी प्रभाकर स्टुडियो, शालिनी सिनेटोन हा स्टूडियो देवासच्या राजाकडून वी. शांताराम यांनी लीजवर घेऊन या स्टूडियोचे नाव शांताकीरण असे केले. पुढे कोल्हापूरात राज सिनेटोन, छत्रपती सिनेटोन, प्रभात सिनेटोन, श्याम सिनेटोन, श्याम शिवाजी सिनेटोन, माया सिनेटोन, लता मंगेशकरांचे सुरेल चित्रण आणि दिनकर पाटीलांचे उदय कला चित्र,अनंत मानेंच चेतना चित्र, यासारख्या अनेक चित्रपट कंपन्या कोल्हापूरात आजही आहेत. पुढे पुण्यातील स्टूडियो बंद पडल्यावर हा ओघ कोल्हापूरकडे वळलेला दिसतो. चित्रपट निर्मितीसाठी कोल्हापूरमध्ये येऊन अनेकांनी चित्रपट निर्माण केलेले आहेत.  कोल्हापूराचे निर्सग सौंदर्य, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूर के चित्रपट निर्मितीसाठी आवडते केंद्र बनले होते. 1984 मध्ये शासनाकडून पाठपुरावा करून चित्रनगरी वसवली. मधल्या काळात अनेक स्थिंत्यतरे झाली. मात्र, पुन्हा एकदा चित्रनगरीने भरारी घेतली आहे. आता येथे मराठी आणि हिंदी सिलीयल आणि चित्रपट निर्मिती होत आहे.

कोल्हापूराचे सिनेसृष्टीमधील योगदानाचा आढावा घेतल्यास एक-पेक्षा एक व्यक्तीमत्व कोल्हापुरने दिले आहेत. यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वी.शांताराम, भालजी पेंढारकर, बाबुजी पेंटर, सुधीर फडके, ग.दी. माडगुडकर, दत्ता डावजेकर, जगदीश खेबुडकर, त्यागराज पेंढारकर, जी. कांबळे, आशुतोष गोवारीकर, उषा जाधव, अंनत काळे, ऑसकर विजेता भानु अथैया अशी न संपणारी यादी आहे. हिंदी चित्रपट सृष्टीचे शो मॅन मानले जाणारे राज कपूर यांची कारकीर्दही कोल्हापूरातून सुरू झाली, पेंढारकरांच्या ‘वाल्मीकी’ या चित्रपटात नारदाची छोटीशी भुमिका करून चित्रपट सृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटासाठी त्यांना मानधन मिळाले होते.  असेही  डॉ. गगराणी यांनी सांगितले. महात्मा गांधीच्या हत्येनंतर बेचिराख झालेला जयप्रभा स्टूडियो फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभा करून नव्याने चित्रपट निर्मिती भालजी पेंढारकर यांनी केली , असा ध्यास त्याकाळातील लोकांमध्ये होता असे, डॉ. गगराणी म्हणाल्या.

000

 

अंजु निमसरकर/ वृत्त क्रमांक 139/ 10.05.2021