प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सांगलीतील स्व. वसंतदादा पाटील स्मारकाच्या कामांसाठी ४ कोटी ८२ लाख रुपयांच्या निधीस मान्यता

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३१ : स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या सांगली  जिल्ह्यातील स्मारकाच्या उर्वरित कामासाठी ४ कोटी ८२ लाख रुपये एवढ्या निधीला सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री, डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

माजी मुख्यमंत्री स्व.पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील याबरोबरच सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी केली होती.

स्व. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध झाल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, कलादालन, विस्तार कक्ष, प्रशासकीय कक्ष आदी अपूर्ण असलेली  कामे पूर्ण होणार आहेत. या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सांगली महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी, डॉ. अभिजित चौधरी यांनी आतापर्यंत स्मारकासाठी जवळपास 12 कोटी खर्च झाला असून ज्या सुविधा पूर्ण झाल्या आहेत, त्या जनतेसाठी खुल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 150 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध झाली आहे, असे सांगितले.

यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, स्व.वसंतदादा पाटील यांचे राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय आदी क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी स्वरूपाचे आहे. स्व.वसंतदादांच्या स्मारकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच राज्यातील नवयुवकांना कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल.

या बैठकीला आमदार विक्रम सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे)  अनिल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ना.वळवी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कार्यकारी अभियंता, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, श्री. संपत डावखर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.