रमजान ईद निमित्त विमल सेवा प्रतिष्ठानकडून गिरवली येथे शिरखुरमा किट वाटप

अंबाजोगाई (वार्ताहर):
तालुक्यातील गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठानने मंगळवार,दिनांक ११ मे २०२१ रोजी पवित्र रमजान महिन्याच्या समारोपास रमजान ईदच्या निमित्ताने शिरखुरमा तयार करण्यासाठीच्या साहित्याचे किट वाटप करून यासोबत मास्क व सॅनिटायझर ही दिले.या माध्यमातून सामाजिक सौहार्द जोपासला.

गिरवली गावातील मुस्लिम समाज बांधवांना सदर साहित्य रमजान ईदच्या काही दिवस आधीच वाटप करून प्रतिष्ठानने बांधिलकी जोपासली.सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे.खरेदीसाठी गावातून बाहेर जाऊन संसर्गाचा धोका गावात वाढू नये तसेच रमजान ईद उत्साहात घरीच राहून साजरी करता यावी म्हणून विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिरखुरमा किट (शिरखुरमा तयार करण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य) वाटप करून यासोबत मास्क व सॅनिटायझर ही दिले.यावेळी जयप्रकाश (काकाजी) भुतडा व विमल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पतंगे,सखाराम मामा शिंदे,पवन गिरवलकर,संतोष चौधरी,राहुल लंगे हे उपस्थित होते.विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून आदर्श निर्माण करणारे गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठान यांच्या समाजाभिमुख कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विमल सेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व गिरवली येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

*मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा सर्वांत पवित्र महिना*
=============
रमजान महिना सर्व मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानला जातो.यामध्ये चंद्राच्या दर्शनाला फार महत्व आहे.रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते.त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सन ईद-उल-फितर म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात.ईद हा सण संपूर्ण जगातून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो,त्या निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते.या दिवशी शेवया,दूध आणि सुक्यामेव्या पासून बनवलेल्या शिरखुरमाचे विशेष महत्त्व असते.तसेच बरेचसे लोक या दिवशी हज यात्रेला जाण्याचे सुद्धा नियोजन करतात.या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदी मध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्यानंतर आपल्या परिजनांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

-पवन गिरवलकर (सामाजिक कार्यकर्ते)

समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार
=============
भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी,जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक सोमनाथअप्पा गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण,पंचक्रोशीतील जनतेची आरोग्य तपासणी शिबीर,ग्राम स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव,मकर संक्रांतीनिमीत्त निराधार वृध्द महिलांना साडी,चोळी,ब्लँकेट दिले तसेच मास्क व सॅनिटायझर वाटप केले.रामफेरी भक्तांना भरपेहराव करणे असे विविध समाज उपयोगी,विधायक उपक्रम राबविण्यात आले.

– वसंतराव पतंगे (अध्यक्ष,विमल सेवा प्रतिष्ठान,गिरवली.)