अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

आपेगाव कोविड केअर सेंटरमधून कोरोनावर मात केलेल्या पठाण कुटुंबाचा ह्रद्य सत्कार

पॉझिटिव्ह विचाराच कोरोनाला हरवू शकतात ; घाबरू नका कोरोनावर मात करा-जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख
===================
अंबाजोगाई (वार्ताहर):
योग्य औषधोपचाराने कोरोनाला हरवता येते.याचे उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील पठाण कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे.कुटुंबातील पाच जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.त्याबद्दल जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी रविवार,दिनांक ३० मे रोजी पठाण कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन एकञित सत्कार केला.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड.,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया)संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,
ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून आपेगाव येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांवर मोफत औषधोपचार करून रूग्णांना दररोज योगाचे धडे,योग्य औषधोपचार,पौष्टिक आहार,आयुर्वेदिक काढा दिला जात आहे.याचा फायदा असा झाला की,बाधित रूग्ण हे लवकर कोरोनावर मात करून लवकर बरे होत आहेत.पाटोदा (ममदापूर) येथील पठाण कुटुंबातील अशाच ५ जणांनी कोरोनावर नुकतीच मात केली.त्याबद्दल रविवारी पुष्पहार घालून राजेसाहेब देशमुख माकेगावकर,राजाभाऊ देशमुख व इतरांच्या उपस्थितीत ह्रद्य सत्कार करण्यात आला.पठाण कुटुंबात २० दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला.सर्वप्रथम आजोबा बाधित झाल्याने हळूहळू संपूर्ण कुटुंबच बाधित झाले होते.पण,न घाबरता सर्वांनी योग्यवेळी कोरोनाच्या चाचण्या केल्या.यात वयोवृद्ध असलेले महेबूबखाँ पठाण हे ७३ वर्षीय आजोबा,त्यांचा मुलगा बापूखाँ (वय ४६),सूनबाई बिस्मील्लाबी (वय ४४),नातू अमजद (वय २४),नातू समीर (वय २२ ) असे एकूण पाच जण पॉझिटिव्ह निघाले.आजोबांना जास्त त्रास नसला तरी त्यांचे वय पाहता त्यांना आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.भारत नागरे, डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे,डॉ.फड,डॉ.गायञी ढमाले,परीचारीका कावरे,ढाकणे,कराड,देशमुख,मुंडे,जगदाळे,शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत,बालाजी वाघमारे,रवी सरवदे,अजित बनसोडे यांच्या टीमने आजोबा व सर्व कुटूंबियांवर यशस्वी उपचार केले.डॉक्टरांनी धीर देत केलेले उपचार व प्रबोधनामुळे रूग्णालयात कसलीही
अडचण आली नाही.येथील डॉक्टर कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे रूग्णांची काळजी घेतात.याचा अनुभव आल्याचे सांगून आपेगाव कोविड केअर सेंटर मधून दर्जेदार आरोग्य सेवा,सुविधा मिळाल्या,यामुळे पुनर्जन्म मिळाल्याची माहिती दिली.हसत खेळत व आनंदी वातावरणात उपचार करण्यात आले.हे कोविड सेंटर एक "हॅप्पी होम" असल्याची प्रतिक्रिया देताना पठाण कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.यावेळी बोलताना "वेळेवर योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर कोरोना १०० टक्के बरा होतो.घाबरून न जाता योग्य औषधोपचार घ्यावेत.कोणतेही
दुखणे अंगावर काढू नका.तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.कोरोना झालेल्यांना धीर द्यावा.कोरोना बाधितांचा तिरस्कार करू नका,तर यातून लवकर बरे होण्यासाठी रूग्णांना धीर द्यावा." असे बिस्मिल्लाबी पठाण म्हणाल्या,आणि "कोरोनाला घाबरू नका.तर सकारात्मक विचार ठेवा.नियमित व्यायाम करा.योग्य आहार,औषधोपचार घेतल्यास कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करता येते.आता आम्ही कुटुंबातील सर्वच जण ठणठणीत बरे झालो आहोत.कोणालाच कसलाही त्रास नाही." अशी माहिती अमजद बापूखाँ पठाण यांनी दिली.तसेच "कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर आपण स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे लपवू नका तर तात्काळ इतरांपासून स्वतःला दूर ठेवा.कुणालाही आपल्या संपर्कात येवू देवू नका,घरी किंवा शासकीय विलगीकरणात रहा,संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी." असे समीर बापूखाँ पठाण यांनी सांगितले.तर "कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला गरज असते ती मानसिक आधाराची,त्यामुळे रूग्णाला धीर द्या.रूग्ण तणावमुक्त कसा राहिल याकडे लक्ष ठेवा.कोरोनाची भिती बाळगू नका.बाधित व्यक्तीस नातेवाईक,मित्रपरिवाराने आधार दिला पाहिजे." असे महेबुबखाँ रहेमतखाँ पठाण म्हणाले.

*कुटुंबातील सदस्य समजून काळजी घेतली :-*

मी व माझा परिवार कोरोना पॉझिटिव्ह आहोत.हे कळताच जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या मनातील कोरोना बाबतची भीती नाहीशी करून धीर दिला.आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले.यावेळी राजाभाऊ देशमुख (अंजनपूर) व बळीराजे वाघमारे यांनी सहकार्य करून मनोबल वाढवले.तज्ञ डॉक्टर व परीचारिका यांनी घरच्यांपेक्षा ही आमची अधिक काळजी घेतली.सकाळी योगा व प्राणायाम,सतत सकस आणि पौष्टिक आहार,योग्य औषधोपचार व आयुर्वेदिक काढा,संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम यामुळे तणावमुक्त राहिल्यामुळे आम्ही लवकरच व्याधीमुक्त झालो आहोत.सहकार्य करणा-या सर्वांचे आभारी आहोत. *-बापूखाँ मेहबूबखाँ पठाण,पाटोदा (ममदापूर).*

*तणावमुक्त वातावरणामुळे कोरोना बरा होतो :-*

दर्जेदार रूग्णसेवेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात आपेगाव हे उत्कृष्ट कोविड केअर सेंटर म्हणून नांवारूपास येत आहे.या सेंटरच्या परीसरात प्रवेश करताच रूग्ण आपली व्याधी विसरून जात आहेत.या सेंटर मधील रूग्णांवर अतिशय उत्तम रितीने औषधोपचार करून योगाभ्यासाचे धडे,पौष्टिक आहार,आयुर्वेदिक काढा,हळदीचे दूध,औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे अर्कयुक्त औषधी देण्यात येत असल्याने मागील काही दिवसांत आपेगाव कोविड केअर सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल केलेले रूग्ण तणावमुक्त वातावरणामुळे ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पॉझिटिव्ह विचाराच कोरोनाला हरवू शकतात हे लक्षात घेवून ग्रामीण भागातील जनतेने न घाबरता कोरोनाला सामोरे जावे.कारण,या संकटकाळात आम्ही आपल्यासोबत आहोत.

*-राजेसाहेब देशमुख (जि.प.सदस्य,बीड.)*