अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

सर्वच व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या – जिल्हाधिका-यांना महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परीषदेचे निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर): अंबाजोगाई शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर व्यावसायिकांना देखिल दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परीषदेने जिल्हाधिकारी,बीड यांना गुरूवार,दिनांक ३ जून रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परीषदेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मागील अनेक महिन्यांपासून अंबाजोगाई येथील अत्यावश्यक सेवा व इतर व्यवसायिकांची दुकाने ही बंदच आहेत.कोविड १९ मुळे आपण घेतलेले निर्णय हे योग्य व आवश्यक आहेत.परंतू,कोरोना प्रार्दुभावाची पुर्वीची स्थिती व सद्यस्थिती मध्ये बराच फरक पडलेला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्यामुळे खूपच विपरीत परिणाम होत आहेत.या व्यावसायिकांवर व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.परिणामी त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.तसेच मोठ-मोठ्या व्यवसायिकांना बँकेची कर्ज फेड,दुकानाचे भाडे,लेबर पेमेंट,वीज बील भरणा यासारख्या अनेक समस्या आहेत.त्यासाठी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना आपणांस योग्य वाटेल त्या वेळेचे बंधन टाकून व्यवसाय चालविण्यास परवानगी देणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे.जर व्यवसाय चालविण्यास परवानगी नाही दिली तर व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही व यामुळे विदारक परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.आम्हा व्यवसायिकांना व्यवसाय चालविण्यास परवानगी दिल्यानंतर आम्ही आपण दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास तयार आहोत.त्या बाबत कसली ही तक्रार येऊ देणार नाहीत.तरी जिल्हाधिकारी साहेबांनी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखिल वेळेच्या बंधनानुसार व्यवसाय चालविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सलमान बेग,तालुकाध्यक्ष शेख शौकत,तालुका उपाध्यक्ष शेख जुनेद शेख खाजा,युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे तालुकाध्यक्ष अकबरखाँ पठाण,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख आमेर शेख मुनवर,सैफ अजमल खान,अस्लम बेग,इमाद जहागिरदार आदींनी सदरील निवेदनाद्वारे केली आहे.