बीड : डॉ प्रितमताई मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांना मारहाण झाली होती. यावेळेस काही लोकांनी एका पोलीसालाही मारहाण केल्याचे समोर आले असून या प्रकरणी २९ कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ही मारहाण होताना केवळ बघ्याची भूमिका घेणे तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अंगलट आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना निलंबित केले आहे.
डॉ प्रीतमताई मुंडे यांची मतदार नोंदणीमध्ये दोन ठिकाणी नावे आहेत.डॉ प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या मालमत्तेवरील नावात स्वतःच्या नावासमोर पतीचे नाव लावले आहे. परंतु केवळ मते मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वतःच्या नावासमोर वडीलांचे नाव लावले आहे, असा आरोप दादासाहेब मुंडे नी केला होता. मात्र आक्षेप घेतल्याने मुंडे समर्थकांनी दादासाहेब याना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मारहाण केली. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही पोलिसांनी मारहाण सुरु असताना बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली होती. दरम्यान, मारहाण होताना दादासाहेब मुंडे यांना सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय रुपचंद वंजारे या पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वंजारे यांच्या फिर्यादीवरून बाबरी मुंडे, स्वप्नील गलधर, संग्राम बांगर, संतोष राख यांच्यासह २५ अनोळखी व्यक्तींवर शासकीय कामकाजात अडथळा आणि कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस दलातील एस.पी. शेळके, पी.के. सानप या दोन पोलीस हवालदारांसह महिला पोलीस शिपाई डी.व्ही. चाटे या तीन कर्मचाऱ्यांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बंदोबस्त दिला होता. सायंकाळच्या सुमारास येथे मारहाणीची घटना घडली. यावेळी हे तिघेही गैरहजर होते. पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनेचा आढावा घेतल्यानंतर हे तीनही कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे समोर आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या तिनही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची चौकशीही सुरू केली असल्याचे सूत्रांकडून समजते.