बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

चांदूर बाजार, ता. 2 : बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील 13 व अचलपूर तालुक्यातील 3 अशा 16 गावांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम असमाधानकारक असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आज दिले.

 

जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी बोर्डी नाला प्रकल्पातील सांडवा, धरण, घळभरणी, धरणात झालेल्या अंशतः जलसाठ्याची पाहणी आज केली. या पाहणीदरम्यान बोरगांव मोहना, तुळजापूर गढी रस्त्यावरील पुच्छ कालव्याच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

1 87

या प्रकल्पाची क्षमता 18.49 दलघमी इतकी आहे. जून 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर 4 हजार 126 हेक्टर जमिनीला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.

 

तुळजापूर गढी येथे शेतीसाठी तात्काळ रस्ता द्यावा

 

तुळजापूर गढी येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला, अशी शेतकरी बांधवांची तक्रार होती. त्याचे गांभीर्य जाणून राज्यमंत्री श्री.कडू यांनी प्रत्यक्ष रस्ता व पांदणरस्त्यांची पाहणी केली. तुळजापूर गढी गावातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे सुमारे 300 एकर जमीन पिकांपासून वंचित राहून नुकसान शेतकऱ्यांनाच भोगावे लागणार आहे. त्याबद्दल राज्यमंत्री श्री. कडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकरी बांधवांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कंत्राटदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या कंत्राटदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई तात्काळ करावी, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या पाहणी दरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता सुनील राठी,सांबाविचे अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता सी. यु. मेहेत्रे, उपअभियंता एम.पी.भेंडे, सहाय्यक अभियंता  श्रेणी 1 -निरज माळवे, प्रहारचे  पदाधिकारी दिपक भोगाडे आदी उपस्थित होते.