मुंबईतील भगतसिंग नगर नं. 2 व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना सदनिका देणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 2 : मुंबईतील भगतसिंग नगर नं. 2 व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र  प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या सदनिकांमधून उपलब्धतेनुसार सदनिका देणार असल्याची माहिती, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी दिली.

राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. धोंडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या माधवी राणे सहभागी झाले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला गोरेगाव, मालाड विभागात डीपी रोड पोईसर नाला रुंदीकरण इत्यादी विविध प्रकल्पांसाठी मागील दोन वर्षात एकूण 806 प्रकल्पग्रस्त सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून उपलब्ध झाल्या आहेत. या सदनिकापैकी अद्यापपर्यंत वाटप न झालेल्या सदनिकांचे उपलब्धतेनुसार वाटप प्राधान्याने भगतसिंग नगर नं. 2 व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र  प्रकल्पग्रस्तांना करण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

महानगरपालिकेला मिळालेल्या सदनिका उपलब्धतेनुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

०००००

देवेंद्र पाटील /दि.2 जुलै 2021

Previous post बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा
Next post खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी