आठवडा विशेष टीम―
चंद्रपूर दि. 28 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने नव्या मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, त्यामुळे मतदारांची नाव नोंदणी करतांना अत्यंत काटेकोरपणे करा, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह, वरोरा येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेताना त्या बोलत होत्या.
यावेळी उपायुक्त आशा पठाण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार श्रीमती मकवाने प्रामुख्याने उपस्थित होते.
मतदारांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने, प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. असे सांगून श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, नाव नोंदणी करतांना कोणत्याही व्यक्तीचे नाव सुटता कामा नये, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांकडे विशेष लक्ष द्या, त्यांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करा. तसेच ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा. असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी वरोरा तालुक्यातील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा येथील चार मतदान केंद्राला तर बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोर्डा येथील चार अशा एकूण आठ मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची तसेच कामकाजासंदर्भात माहिती जाणून घेतली.
00000