आठवडा विशेष टीम―
अमरावती, दि. 10 : जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नल से जल’अंतर्गत प्रतिदिन, प्रतिमाणशी 55 लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष्य असून, 2024 पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे. त्याचप्रमाणे, पाणी स्त्रोत विकास, साठवण आणि पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले.
विभागातील पाच जिल्ह्यांतील ‘जलजीवन मिशन’, ‘स्वच्छ भारत मिशन’, अटल भूजल या योजनांबाबत आढावा बैठक डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी, अवर सचिव अनुष्का दळवी आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याचे मु, का. अ. सौरभ कटियार,यवतमाळचे मु. का. अ. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वाशिमच्या जि. प. सीईओ वसुमना पंत आदी उपस्थित होते.
जलजीवन अभियान हे ग्रामीण जनतेच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे असून, या उपक्रमाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले. ते म्हणाले की, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व अटल भूजल या तिन्ही योजनांतील उद्दिष्टे सर्व जिल्ह्यांत पूर्ण होण्यासाठी मिशन मोडवर कामे करावीत. पाणी स्त्रोत विकास, साठवण आणि पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच स्त्रोतांचे पुनरूज्जीवन व बळकटीकरण करणे आवश्यक आहे. खारपाणपट्ट्यातही तेथील वैशिष्ट्ये व कामाची गरज लक्षात घेऊन कामे राबवावीत. याबाबत प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र’मधील अपेक्षित कामे विहित काळात पूर्ण करावीत, असे निर्देश डॉ. महाजन यांनी दिले. वैयक्तिक स्वच्छतागृहांचे विभागात 29 हजार 441 चे उद्दिष्ट असून, अकोला जिल्ह्यात 3 हजार 479, अमरावती जिल्ह्यात 4 हजार 421, यवतमाळ जिल्ह्यात 12 हजार 316, वाशिम जिल्ह्यात 5 हजार 225, बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार असे उद्दिष्ट आहे. योजनेत 30 टक्के उद्दिष्ट 15 जानेवारीपूर्वी, तर 70 टक्के उद्दिष्ट 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
उपक्रमाला वेग येण्यासाठी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना सूचना द्याव्यात. त्याचप्रमाणे, या उपक्रमाची गरजूंपर्यंत माहिती पोहोचवावी. अधिकाधिक जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी जीवन प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उपलब्धता वाढविण्यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत असून त्याचीही प्रभावी अंमलबजावणी सर्व जिल्ह्यात व्हावी, असे निर्देश प्रधान सचिवांनी दिले. उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
000