आठवडा विशेष टीम―
मालेगाव, दि. 5 (उमाका वृत्तसेवा) : अजंग राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्सटाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई या दोन मोठ्या उद्योग समूहांनी मालेगावमध्ये गुंतवणूक केल्याने या एमआयडीसीच्या विकासाला चालना मिळेल. तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
आज तालुक्यातील अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई या दोन मोठे उद्योग समूह प्रकल्प भूमिपूजन व प्लॉट्स हस्तांतरण कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर निलेश आहेर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितिन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, मालेगाव उद्योग समितीचे संजय दुसाने, विजय लोढा, महेश पाटोदीया, अजय बच्छाव, सतीश कासलीवाल, अरविंद पवार आदी उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले, शेती महामंडळाची 4 हजार एकरपेक्षा जास्त जमीन तालुक्यात उपलब्ध आहे. यातून 863 एकर जमिनीवर एमआयडीसी तयार करण्यात येत आहे. शेती महामंडळाची जमीन उपलब्ध झाल्याने अतिशय जलद गतीने या भागाचा विकास होणार असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले.
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले की, तालुक्यातील अजंग रावळगाव येथे 863 हेक्टरवर एमआयडीसीत राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई हे दोन मोठे उद्योग समूह प्रकल्प उभारणार येत आहेत. यासाठी दोन्ही उद्योग समूहांनी अनुक्रमे ३५ कोटी व ८० कोटी अशी एकूण ११५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याने ही मालेगाव उद्योग क्षेत्रासाठी अभिमानस्पद व प्रगतीशील बाब आहे. तालुक्यातील अजंग रावळगाव येथे 863 एकर जमीनीचे 34 कोटी 17 लक्ष रुपये एमआयडीसीने शेती महामंडळाला वर्ग केलेले आहेत. तसेच या अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत 211 उद्योजकांनी प्लॉट्स बुकींग केली असून त्यापैकी 75 पेक्षा जास्त उद्योजकांनी 100 टक्के रक्कम भरली आहे. नवीन उद्योगाला उभारणीसाठी रस्ते तयार करण्यात आले असून वीज, पाणी प्रकल्प आदी सुविधा लवकरच देण्यात येतील असेही श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
या उद्योग बांधकामासाठी लागणारे पाणी चणकापूर आणि पुनद धरणामधून आरक्षित करण्यात आले आहे. वीजेच्या बाबतीत उद्योगासाठी कायमस्वरुपी लागणारी वीज देण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन निर्माण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उद्योजकांनी नवीन उद्योग उभारणासाठी प्लॉटस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी मंत्री भुसे यांनी केले आहे.
एमआयडीसीच्या नियमांनुसार पहिल्या टप्यामध्ये 60 रुपये स्केअर फूट हा दर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून दुसऱ्या टप्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली असल्याचेही मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. 1 जानेवारी, 2022 पासून जो 160 रुपयाचा दर लागू करण्यात आला होता. तो दर टप्पा क्र. तीनसाठी परत 60 रुपये स्केअर फुट करुन देण्यात आला असून, तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती आता 31 मार्च, 2022 पर्यंत शेवटची मुदत आहे. जेवढया मोठ्या प्रमाणात उद्योग मालेगावमध्ये येतील तेवढा मालेगावचा सर्वांगिन विकास होण्यास मदतच होईल. या एमआयडीसमध्ये टेक्सटाईल्स उद्योग, प्लॉस्टीक उद्योग व कृषीपुरक उद्योग असे एकूण तीन झोन करण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प नामांकित व पर्यावरणापुरक असेल. तसेच शासनाच्या जेवढ्या योजना आहेत या सर्व सवलती उद्योजकांना मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्योजकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्लॉटस् प्रमाणपत्राचे वाटप
निलेश आहेर, जयश्री पुराणिक, रितेश पवार, संध्या महाजन, अभिजित पाटील, गौरव वडेरा, संजय दुसाणे, रामचंद्र सुर्यवंशी, आशा सोनजे, आदी उद्योजकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्लॉटच्या प्रमाणपत्राचे वाटप कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले आहे.
0000000000