आठवडा विशेष टीम―
सांगली दि. 8 (जि.मा.का.) : जैवविविधतेने नटलेले चांदोली पर्यटन क्षेत्र हे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन स्थळाचा विकास होवून या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येतील यासाठी सर्वांगीण गोष्टींचा विचार करून शासनाच्या निर्देशानुसार आराखडा तयार करावा, असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह सांगली येथे चांदोली पर्यटन विकासासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपविभागीय वन अधिकारी श्री. माने, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, वारणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता मिलींद किटवाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, चांदोलीचा सर्वांगीण पर्यटन विकास व्हावा यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावेत. तसेच चांदोली पर्यटन क्षेत्रामध्ये क्रोकोडाईल (मगर) पार्क तयार करण्यासाठी वन विभागाने व संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांदोली वारणा पर्यावरणपूरक ट्युरिझम मॉडेल तयार करण्यात यावे, असे आदेशित केले. या मॉडेलमध्ये रिसॉर्ट्स, हॉटेल्स, ॲडव्हेंचर स्पोर्टस, वॉटर स्पोर्टस याचबरोबच बॉटनिकल गार्डन यांचा समावेश करण्याबाबतही विचार व्हावा व त्यानुसार आराखडा तयार करण्याबरोबरच आरोग्य पर्यटनावरही भर द्यावा. त्याचबरोबर होम स्टे याचीही सुविधा या ठिकाणी करण्याबाबत आराखड्यात विचार व्हावा. तसेच चांदोली परिसरात मिळणाऱ्या स्थानिक रानमेवा व शेतीपूरक माल यासाठीची विक्रीची सोय व्हावी, असेही नियोजन करावे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. सदरचा आराखडा तयार करताना तो पर्यावरणपूरक असावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी यावेळी चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबतचे सादरीकरण केले.
000