प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य यात्रा’- पालकमंत्री बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अकोला, दि.२५(जिमाका) – आपला देश प्रजासत्ताक आहे.याचाच अर्थ इथं प्रजा सत्ताधारी आहे, आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. नागरिकांची सरकार दप्तरी प्रलंबित असणारी कामे, एकाच जागी व्हावी, त्यांना हेलपाटे करावे लागू नये, हा ‘कर्तव्य यात्रे’चा उद्देश असून ही यात्रा केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे, असे  प्रतिपादन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जांभा बु. ता.मूर्तिजापूर येथे केले.

जांभा बु. येथे आज पालकमंत्री कडू यांच्या संकल्पनेतून ‘कर्तव्य यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पंचायत समिती सभापती उर्मिला डाबेराव, सरपंच जांभा बु. श्रीमती अरुणा इंगळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक अभियंता जलसंपदा सुनील राठी, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, सहा. कामगार आयुक्त राजू गुल्हाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे,  तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.काळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

कर्तव्य यात्रेचा शुभारंभ जांभा बु. या पुनर्वसित गावठाणात करण्यात आला. प्रारंभी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री कडू म्हणाले की, लोकांना सरकार दप्तरी असलेले एक काम करण्यासाठी  तालुक्याच्या गावी जावे लागते. त्यांना खर्च तर होतोच शिवाय कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, यामुळे अनेकदा मनस्ताप ही होतो. अशावेळी ह्या सर्व यंत्रणांना एकाच छताखाली आणून लोकांचा हा त्रास वाचविण्याचा व त्यांना पारदर्शक सेवा त्यांच्या गावात जाऊन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामागे केवळ सेवाभाव हाच उद्देश आहे. याठिकाणी विविध सेवांचे स्टॉल लावण्यात आले आहे. एकाच ठिकाणी ह्या सर्व सुविधा आणल्या आहेत, असेही पालकमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. पुनर्वसित गावातील लोकांना द्यावयाच्या सर्व सुविधा देण्यात येतील. याठिकाणी न्याय प्रविष्ठ बाबी वगळता सर्व सेवा सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे,असेही पालकमंत्र्यानी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी लोकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. सूत्रसंचालन आकांक्षा गोमासे यांनी केले.

 या उपक्रमात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याद्वारे नागरिकांना त्या त्या विभागांच्या योजनांची माहितीही देण्यात आली तसेच त्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रियाही राबविण्यात आली. या शिवाय महिलांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचाही महिलांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करुन घेतली.

००००

दिव्यांग, अनाथांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी ८ मार्चपासून विशेष मोहीम

जिल्ह्यातील दिव्यांग, अनाथ व्यक्तींना शिधापत्रिका देऊन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी दि.८ ते १५ मार्च दरम्यान विशेष नोंदणी मोहीम राबवावी,असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मूर्तिजापूर येथे दिले.

पालकमंत्री कडू यांनी आज जिल्ह्यातील शिधापत्रिका वितरण व त्यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.काळे, तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व पुरवठा निरीक्षक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या इष्टांकानुसार पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवावयाचे आहे. त्याचा यावेळी तालुका निहाय आढावा घेण्यात आला.

पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात दि.८ ते १५ मार्च या कालावधीत अनाथ व दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवावी. यात गावनिहाय स्वस्त धान्य दुकानदारामार्फत त्यांच्या दुकानाशी जोडलेल्या कुटुंबातील दिव्यांग, अनाथ व्यक्तींची माहिती घ्यावी. अशा व्यक्तींना अंत्योदय योजनेचे कार्ड देऊन लाभ देण्यात यावा. याशिवाय अंत्योदय योजनेत अपात्र लाभार्थ्यांची नावे आलीत का? याबाबत पडताळणी करण्यात यावी. याशिवाय शिधापत्रिका विभक्त करणे, जीर्ण शिधापत्रिका बदलवून देणे, नवीन शिधापत्रिका देणे ही कामे नजीकच्या काळात विशेष शिबीर आयोजित करून नागरिकांना सेवा द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या मोहिमेत उत्तम कार्य करणाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल,असेही त्यांनी घोषित केले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात पतपुरवठा करून रोजगार निर्मितीस चालना द्यावी

अकोला,दि.२५(जिमाका)-जिल्ह्यात कार्यरत मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात पतपुरवठा वाढवावा, त्याद्वारे रोजगार निर्मितीस चालना द्यावी,असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मूर्तिजापूर येथे दिले.

जिल्ह्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांसंदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील,तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ग्रामीण भागात छोटे व्यवसाय करणारे, शेतीपूरक व्यवसाय करणारे ,महिला, महिला बचतगट अशा घटकांना अर्थसहाय्य मायक्रोफायनान्स कंपन्यांनी करावे. हा पतपुरवठा वाढवून रोजगार निर्मितीला चालना द्यावी, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी यावेळी दिले. या पतपुरवठ्याद्वारे शेळीपालन, कुक्कुटपालन, घरगुती उद्योग, लहान व्यावसायिक अशा घटकांना प्रगतीसाठी चालना मिळेल. याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पतपुरवठ्यासाठी एक आराखडा तयार करावा,अशीही सूचना त्यांनी केली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, तहसिलदार प्रदीप पवार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

०००००

Back to top button