आठवडा विशेष टीम―
पारंपारिक लोककलांची जनतेला मेजवानी
ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर दि. 28 : राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यामार्फत सामान्यांच्या जीवनात बदल घडून यावा यासाठी स्थानिक भाषेत व स्थानिक कलाकारांच्या सहभागात राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना व गेल्या दोन वर्षातील उपलब्धीचे सादरीकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा, तसेच अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक व सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या प्राथमिक योजनांची माहिती यामार्फत दिली जाते. सदर पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेच्या पारंपारिक कलांची ही मेजवानी मनाला भावत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, गण, गवळण,कव्वाली, भारूड, बतावणी अशा विविध कला व त्यातून होणारे लोकप्रबोधन याला खीळ बसली होती. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्थानिक जिल्ह्याच्या विविध योजनांमधून हे कार्यक्रम राबविण्यासोबतच आपल्या नव्या मोहिमेत दमदार कला पथकांच्या गटामार्फत राज्य शासनाच्या दोन वर्षातील उपलब्धी संदर्भात मांडणी सुरू केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हे पथनाट्य ग्रामीण भागात होत आहे. शहराच्या काही भागातही पथनाट्य होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात विविध तालुक्यात पथकाने आपल्या स्थानिक भाषेतून लोकांसमोर योजनांची मांडणी केली. याला शहरी व ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.
0000