प्रशासकीय

दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे – पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अकोला दि.29(जिमाका)- दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र म्हणजेच ई- ट्रायसिकल  वाटप हे  दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राबविण्यात येत आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून दिव्यांगांच्या विकासासाठी वेगळे धोरण, संकल्पना आकारास येईल,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ शुक्ला, माविमच्या अकोला समन्वयक वर्षा खोब्रागडे, उमेदचे गजानन महल्ले आदी उपस्थित होते.

 

पहिल्या टप्प्यात 119 ट्रायसिकल अर्थात फिरते विक्री केंद्र दिव्यांगांना वाटप करण्यात आले होते. या दुसऱ्या टप्प्यात आणखी 100 ट्रायसिकल वितरण करण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. याच कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांच्या स्वयंसहायता बचतगटांना  अर्थसहाय्याचे धनादेश वितरण करण्यात आले.

उपस्थित दिव्यांगांशी संवाद साधतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, दिव्यांगांच्या बचतगटांना अर्थसहाय्य दिले जाते आहे. त्यातून त्यांच्या विविध व्यवसायांना चालना मिळेल. दिव्यांगांना फिरते विक्री क्रेंद्र वितरण करुन त्यामाध्यमातून विक्रेत्यांची एक मोठी साखळी आपण निर्माण करु शकतो. दिव्यांगांचे यातून आर्थिक सक्षमीकरण व्हावे हा यामागील हेतू आहे. दिव्यांगांनी इतके आर्थिक सक्षम व्हावे की, त्यांनी अन्य दिव्यांगांना मदत करावी.  दिव्यांग हे कमावते झाले पाहिजे,असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. त्यानंतर पालकमंत्री यांनी दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वितरण करुन त्यांच्याशी संवादही साधला.

000

Back to top button