प्रशासकीय

घुग्घूस शहराच्या विकासाकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

आठवडा विशेष टीम―

चंद्रपूर दि. 30 मार्च: घुग्घूस शहरातील विकासकामांनी आता गती पकडली आहे. जनकल्याण व जनसेवेसाठी आवश्यक सर्व सुविधा घुग्घूस येथे उपलब्ध असाव्यात, हे ध्येय निश्चित करून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यापुढेही ही विकासकामे अशीच सुरु राहणार असून घुग्घूस शहराच्या विकासाकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. घुग्गुस नगरपरिषद येथे आयोजित अग्निशमन वाहनाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते.

यावेळी, आमदार किशोर जोरगेवार, तहसिलदार निलेश गौंड, मुख्याधिकारी अर्शिया जुही, घुग्घूसचे पोलीस निरीक्षक बी. आर.पुसाटे  तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

घुग्घूस शहराच्या विकासाकरिता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही. असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, घुग्घूस,नगर परिषदेकरीता 2 अग्निशमन वाहने उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याकरिता शासनाकडून रु. 86.56 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासोबतच दलितेत्तर सुधारणा योजनेमधुन शासनातर्फे रु. 32.47 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला असुन याअंतर्गत वार्ड क्र. 6 मध्ये विकास कामांचे भमीपूजन पार पडले.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, घुग्घूस शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्याच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून घुग्घूसवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असून त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी, बांधकाम विभागाचे श्री.गुप्ता,आरोग्य विभाग तथा पाणीपुरवठा विभागाचे अमर लाड, सचिन धकाते, शहर समन्वयक शिखा दिप उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शंकर नागरे यांनी मानले.

00000

Back to top button