आठवडा विशेष टीम―
ठाणे, दि. 1 (आठवडा विशेष) :- नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील नव्याने मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. तसेच काही रस्ते दुरुस्तींच्या कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. तसेच ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी यावेळी श्री. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. शिंदे यांनी काल मेट्रो मार्गाची पाहणी केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, माजी महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्यासह विविध पदाधिकारी, महानगरपालिका, महावितरण, एमएमआरडीए यांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मॉडेला चेकनाका येथून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. याठिकाणच्या रस्ते दुरुस्ती कामाचा शुभारंभ श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. रायलादेवी तलाव येथेही त्यांनी पाहणी करून तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचीही माहिती घेतली व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर श्री. शिंदे यांनी
किसन नगर रोड नंबर -16, किसन नगर नंबर -3 – माव्हिस मेडिकल श्रीनगर येथे पाहणी केली. तसेच श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या कामाचीही पाहणी करून आढावा घेतला. शांतीनगर, आय टी आय सर्कल, रामनगर, इंदिरा नगर सर्कल या ठिकाणच्या रस्त्यांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली.
यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, शहरातील वागळे इस्टेट परिसरात नव्याने अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते दुरुस्तीबरोबरच विविध सेवा सुविधांसाठी खोदण्यात आलेले रस्ते, पदपाथ व ड्रेनेजची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न आहे. तसेच ही कामे करत असताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या तसेच कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
00000